• Wed. Dec 31st, 2025

महापरिनिर्वाण दिनानिमित्त निमगाव वाघा येथे बाबासाहेबांना अभिवादन

ByMirror

Dec 8, 2025

विद्यार्थ्यांच्या भाषणातून उभा केला बाबासाहेबांचा संघर्ष


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे संघर्ष, प्रबोधन आणि परिवर्तनाची प्रेरणा -पै. नाना डोंगरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवनाथ विद्यालय, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रम पार पडला. प्रारंभी शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.


कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपशिक्षिका मंदा साळवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, शरद भोस, तेजस केदारी, तुकाराम पवार, स्वाती इथापे, निकिता रासकर-शिंदे, दिपाली ठाणगे-म्हस्के, रेखा जरे-पवार, तृप्ती वाघमारे, आप्पा कदम, प्रमोद थिटे, संदीप डोंगरे, प्रशांत जाधव, लहानबा जाधव तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्य, सामाजिक संघर्ष, संविधाननिर्मितीतील मोलाचे योगदान, तसेच महापरिनिर्वाण दिनाचे ऐतिहासिक महत्त्व यावर प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या प्रभावी भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट दाद दिली.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे संघर्ष, प्रबोधन आणि परिवर्तनाची प्रेरणा आहे. त्यांनी शिक्षण, समानता आणि बंधुभाव यांसाठी आजीवन लढा दिला. आजची पिढी त्यांच्या विचारांवर चालली तर समाजातील अन्याय, भेदभाव आणि अंधश्रद्धा आपोआप नाहीशी होतील. आंबेडकरांनी दिलेले संविधान फक्त कायदा नसून जगण्याची दिशा आहे. त्यांचे विचार आत्मसात करणे हेच खरे त्यांच्या प्रति अभिवादन ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.


मंदा साळवे म्हणाल्या की, आंबेडकरांनी समाजातील दुर्बल घटकांना आधार दिला, शिक्षण हाच मुक्तीचा एकमेव मार्ग आहे हे त्यांनी जगाला दाखवून दिले. आज मुलांनी त्यांच्या विचारांची ओळख करून घेऊन समाजकारणात, शैक्षणिक क्षेत्रात आणि नैतिक मूल्यांमध्ये प्रगती करणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांनी मेहनत, शिस्त आणि प्रामाणिकता अंगीकारली तर ते बाबासाहेबांच्या स्वप्नातील समतामूलक समाज निर्माण होऊ शकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


कार्यक्रमास नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे आणि रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *