जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचा संयुक्त उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वकील वर्गासाठी मेडिटेशन (ध्यान-धारणा) विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. महावीर नगर, सावेडी येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ध्यान केंद्रात हा उपक्रम सोमवार दि. 8 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता सावेडी येथील ब्रह्माकुमारी केंद्र, महावीर नगर येथे पार पडणार असून, या उपक्रमाचा सर्व वकील वर्गाने लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ॲड. योगेश पैठणकर यांनी केले आहे.
ध्यानामुळे मनःशांती, एकाग्रता आणि मानसिक ताण कमी होण्यास मोठी मदत होते. न्यायव्यवस्थेत सतत तणावाखाली कार्य करणाऱ्या वकील वर्गासाठी ध्यान हा अत्यंत उपयुक्त आणि आरोग्यवर्धक उपाय असल्याने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे म्हंटले आहे. मानवी मन सतत विचारांच्या ताणात अडकलेले असते. व्यावसायिक जबाबदाऱ्या, ताणतणाव, मानसिक दबाव यामुळे अस्वस्थता आणि चिंतेचे प्रमाण वाढते. ध्यानामुळे मन शांत होते. तणाव आणि चिंता कमी होते.
एकाग्रता वाढते रक्तदाब आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. नैराश्यासारख्या मानसिक विकारांवर सकारात्मक परिणाम दिसतो. सतत मध्यस्थी, खटले, कायदेशीर प्रक्रिया यांमध्ये गुंतलेल्या वकील वर्गाला मानसिक शांतीची आवश्यकता अधिक असल्याने हा उपक्रम त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
