निसर्ग सुरक्षित म्हणजे श्रीरामचैतन्य सुरक्षित; कुंभमेळ्यासाठी वृक्षतोडीवरुन गंभीर चिंता व्यक्त
धर्म तेव्हाच खरा आणि जिवंत राहतो, जेव्हा निसर्ग जिवंत असतो -ॲड. कारभारी गवळी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भगवान श्रीराम हे केवळ इतिहासपुरुष किंवा मंदिरातील मूर्ती नाहीत. श्रीराम म्हणजे एक सतत प्रवाहमान, जीवंत चेतना आहे. ही चेतना झाडांमध्ये, प्राण्यांमध्ये, नद्यांमध्ये, पर्वतांमध्ये, हवेत आणि पृथ्वीच्या प्रत्येक कणात अखंड वाहत आहे. साधु-संत आपल्या तप-ध्यानातून या चैतन्याला थेट अनुभवतात. म्हणूनच त्यांच्यासाठी निसर्गाचे संरक्षण हे धर्माचे सर्वांत प्राथमिक आणि सर्वोच्च कर्तव्य असल्याचे पीपल्स हेल्पलार्इनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तर दंडकारण्य सत्याग्रहाच्या माध्यमातून कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध दर्शविण्यात आला आहे.
दर बारा वर्षांनी नाशिकच्या रामकुंडावर लाखो साधु-संत पवित्र स्नानासाठी एकत्र येतात. हा केवळ धार्मिक सोहळा नाही; तर मध्य व दक्षिण भारताच्या पर्यावरणाचे एक जीवंत, जागरूक निरीक्षण असते. साधुजन डोळसपणे पाहतात वनराई किती दाट आहे, नद्या किती स्वच्छ वाहत आहेत, भूजल पातळी कशी आहे, जैवविविधता टिकली आहे की नाही, आणि मानवी हस्तक्षेपाने निसर्गाला किती खीळ बसली आहे. ते श्रीरामचैतन्याला फक्त मंदिरात नव्हे, तर जंगलात, नदीकाठावर, झाडांच्या सावलीत अनुभवतात. त्यामुळे निसर्ग सुरक्षित म्हणजे श्रीरामचैतन्य सुरक्षित, हे समीकरण त्यांच्यासाठी अजरामर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दंडकारण्य हे फक्त झाडे आणि जमिनीचे तुकडे नव्हे. ते श्रीरामचैतन्याच्या मुक्त प्रवाहाचे शाश्वत वाहते क्षेत्र आहे. तेथील प्रत्येक वृक्ष, प्रत्येक प्राणी, प्रत्येक ओहोळ ही त्या चैतन्याची मूर्त स्वरूपे आणि संदेशवाहक आहेत. आजही त्या प्रदेशात मानवाने घातलेले बंधन फारसे नाहीत; श्रीरामचैतन्य तिथे निर्बंधविरहित वाहते आहे. दंडकारण्याची कत्तल म्हणजे या चैतन्यप्रवाहाला खीळ घालणे. हा केवळ पर्यावरणीय नुकसान नाही; तर थेट धार्मिक व आध्यात्मिक आघात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
2026 च्या कुंभाच्या निमित्ताने जर दंडकारण्य तोडले गेले, हजारो एकर जंगल जमीनदोस्त करून “साधुग्राम” नावाने सिमेंट-काँक्रिटचे जंगल उभारले गेले, तर हा केवळ पर्यावरणाचा नाही तर स्वतः कुंभाच्या मूळ आध्यात्मिक अस्तित्वाचाच विनाश असेल. या विनाशाचे दूरगामी परिणाम भयावह आहेत. श्रीरामचैतन्याचा प्रवाह खंडित होईल, कोरडा पडेल, मध्य भारताचा पर्यावरणीय समतोल पूर्णपणे बिघडेल, गोदावरीसह अनेक नद्यांचे जलचक्र मोडके पडेल, जलसंकट गंभीर होईल, कुंभक्षेत्राचा नैसर्गिक व आध्यात्मिक पवित्रपणा नष्ट होईल, सिमेंट-धूळ-गोंगाटाच्या अशुद्ध वातावरणात साधुजनांचे स्नान व तपला महत्त्व राहणार नसल्याचे म्हंटले आहे.
साधु-संतांना आता त्वरेने जागे होणे क्रमप्राप्त आहे. दंडकारण्याचे तात्काळ व संपूर्ण संरक्षण झाले नाही, तर 2026 च्या नाशिक महाकुंभमेळ्याचा पूर्ण बहिष्कार करण्याचा कठोर आध्यात्मिक निर्णय घेत होऊ शकतो. हा बहिष्कार वैयक्तिक रोष किंवा राजकीय दबावातून नव्हे; तर निसर्ग व श्रीरामचैतन्याच्या रक्षणासाठीचा शुद्ध आध्यात्मिक आवाज असेल.
धर्म तेव्हाच खरा आणि जिवंत राहतो, जेव्हा निसर्ग जिवंत असतो. श्रीरामाला शोधण्यासाठी भव्य मंदिरांची नाही तर दंडकारण्यासारख्या मुक्त जंगलांची गरज आहे. कारण श्रीराम तिथेच प्रत्येक पानात, प्रत्येक पक्ष्याच्या किलबिलाटात, प्रत्येक नदीच्या कलकलात साक्षात विराजमान आहेत. दंडकारण्य वाचले तरच खरा रामकुंभ पवित्र राहील. दंडकारण्य वाचले तरच रामचैतन्य आणि भारतीय धर्म परंपरेचे मूळ सार कायमस्वरूपी जिवंत राहणार असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.
