विविध उपक्रमांमधून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव
दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणणे सर्वांचे कर्तव्य -आनंद भंडारी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शहरातील विविध शाळा व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला. 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्याने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. शहरातून काढण्यात आलेल्या प्रभातफेरीने सर्वांचे लक्ष वेधले.
दिव्यांग दिन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, अहिल्यानगर, जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय (अहिल्यानगर), अपंग संजीवनी मूकबधिर विद्यालय (सावेडी), मतिमंद शाळा (अहिल्यानगर), ज्योत्स्ना उद्योग केंद्र (अहिल्यानगर), राष्ट्रसंत आनंदऋषीजी दिव्यांग शाळा (नेप्ती), मतिमंद विद्यालय (नेप्ती) तसेच मतिमंद विद्यालय (तपोवन रोड) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
प्रभातफेरीचे उद्घाट्न जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या करण्यात आले. यावेळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देविदास कोकाटे, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विद्या जोशी, शिक्षण अधिकारी भास्कर पाटील, डी.डी.आर.सी. विळद घाटचे डॉ. दीपक अनाप, म.न.पा. प्रशासन अधिकारी जुबेर पठाण, ॲड. लक्ष्मण पोकळे, राजेंद्र पोकळे, ॲड. राजाभाऊ शिर्के, आनंद कडूस आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभातफेरीतील दिव्यांगांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. टिळकरोड, माळीवाडा भागातून या रॅलीचे मार्गक्रमण झाले. या रॅलीत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह झळकणारी ऊर्जा पाहणाऱ्यांना भावणारी ठरली.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, 100 मीटर व 200 मीटर धावण्याच्या स्पर्धा तसेच कर्णबधिर, अस्थिव्यंग आणि मतिमंद प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देविदास कोकाटे यांनी जागतिक दिव्यांग दिनाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. दिव्यांग कायदा 2016 याविषयी ॲड. राजाभाऊ शिर्के यांनी सविस्तर माहिती दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणणे हे आपणा सर्वांचे प्रथम कर्तव्य आहे. प्रशासन दिव्यांगांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये सर्वतोपरी सहकार्य करत आहे. यावेळी त्यांनी दिव्यांगांसाठी उपलब्ध योजनांचा आढावा घेऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय आरोटे व शिक्षकवर्ग यांनी केले. राजेंद्र पोकळे यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून त्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम चौधरी यांनी केले. आभार यू. आर. उंडे यांनी मानले.
