राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत प्रभावी कामगिरी; राज्य पॅरालिम्पिक स्पर्धेतही उल्लेखनीय यश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रुपीबाई मोतीलाल बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या शालेय खेळाडूंनी इंदापूर येथे पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत शहरातील विद्यार्थ्यांनी प्रभावी कामगिरी करून जिल्ह्याचा मान उंचावला आहे. विद्यालयातील तीन विद्यार्थी आरुषी लांडगे, सार्थक तनपुरे आणि युवराज आव्हाड यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
14 वर्षाखालील मुलांच्या 50 किलो वजन गटात युवराज आव्हाडने अत्यंत दमदार खेळ सादर करत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. कोल्हापूर, मुंबई, सातारा आणि बीडच्या दिग्गज खेळाडूंना पराभूत करत त्याने विजेतेपदाची नैपुण्यपूर्ण कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीच्या आधारावर त्याची उत्तर प्रदेशातील सारंगपूर येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सार्थक तनपुरेने 14 वर्षाखालील मुलांच्या 55 किलो वजन गटात उत्कृष्ट खेळ करत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला. मुंबई, बीड आणि सोलापूरच्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत त्याने सुरुवातीपासूनच आघाडी राखली होती.
विद्यालयातील रुद्र मनोहर गायकवाड याने 17 वर्षाखालील मुलांच्या राज्य पॅरालिम्पिक स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले. अथलेटिक्समधील 100 मीटर आणि 200 मीटर धावण्याच्या दोन्ही उपांत्य फेऱ्यांत रुद्रने प्रथम क्रमांक मिळवून सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या या दुहेरी कामगिरीमुळे त्याची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंचा संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे कौतुक करत राष्ट्रीय स्तरावरही उत्तुंग यश मिळवल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सहकार्यवाह गौरव फिरोदिया, नियामक मंडळाचे चेअरमन अशोक मुथा, शाळा समितीचे चेअरमन भूषण भंडारी, सदस्य गौरव मिरीकर, विश्वस्त सुनंदाताई भालेराव, मुख्याध्यापक अजय बारगळ, उपमुख्याध्यापक आर. एन. भांड व पर्यवेक्षक व्ही. बी. गिरी यांनी या खेळाडूंसह मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. खेळाडूंना क्रीडा शिक्षिका अंजली देवकर आणि अमोल धानापूर्ण यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धा पर्यंत मजल मारली आहे.
