वेदिका नर्सिंग कॉलेज आणि समाज परिवर्तन संस्थेचा संविधान दिनाचा पंधरवडा उपक्रम;
संविधान हे हक्कांचे शस्त्र, त्याचे रक्षण आपले कर्तव्य! -डॉ. भास्कर रणनवरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पाईपलाईन रोडवरील वेदिका नर्सिंग कॉलेज आणि समाज परिवर्तन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संविधान जागर कार्यक्रम उत्साहात पार पडला. संविधान दिनाचा पंधरवडा उपक्रमांतर्गत आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा रुग्णालयाचे वर्ग एक अधिकारी डॉ. दर्शना धोंडे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष डॉ. तुकाराम धोंडे यांनी संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मेट्रन सौ. अशा गायकवाड (आहेर) यांनी कार्यक्रमाविषयी माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे मुख्य वक्ते डॉ. भास्कर रणनवरे यांनी भारतीय संविधानाचा इतिहास, उद्दिष्टे आणि महाकाय निर्मितीप्रक्रिया अत्यंत सविस्तरपणे उलगडून सांगितली. डॉ.रणनवरे म्हणाले की, 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान भारताला सुपूर्त करण्यात आले. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद, तर प्रमुख नेते जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. संविधान तयार करणाऱ्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. बाबासाहेब आजारी असतानाही 2 वर्षे 11 महिने 17 दिवस अखंड परिश्रम घेऊन संविधानाचा मसुदा तयार केला. संविधान लागू होण्यापूर्वी बहुजन समाजास मूलभूत हक्क नव्हते. बोलणे, लिहिणे, वाचन, ज्ञान, ऐकण्याचे अधिकारही नव्हते; संविधानाने हे हक्क त्यांना प्राप्त झाले.
काँग्रेसमधील काही नेत्यांच्या विरोधामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातून निवडून येऊ शकले नाहीत, म्हणून ते संयुक्त बंगाल प्रांतातील जस्सोर, खुलना, बोरीसाल, फरिदपूर येथून मुस्लिम लीग व कृषक समाजवादी पार्टी चे मुख्य मंत्री फजलूल हक यांच्या सहकार्याने व जोगेंद्रनाथ मंडळ यांच्या प्रचारामुळे व नमो शुद्राय जातीच्या लोकांनी मतदान केल्यामुळेनिवडून गेले. त्यांची निवड नष्ट झाल्यानंतरही त्यांच्या राष्ट्रनिष्ठेने प्रभावित होऊन नेहरू आणि पटेल यांनी त्यांना संविधान सभेत येण्याची विनंती केली कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या पहिल्या भाषणात भारत व भारतीय जनता यांच्या विषयी जो राष्ट्रवाद व्यक्त केला होता त्याला प्रभावित होऊन मुंबईतील रिक्त जागेवर त्यांची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे डॉ रणनवरे म्हणाले की, भारतीय संविधानात 370 कलमे आणि 12 परिशिष्टे असून एवढे विस्तृत, सर्वसमावेशक आणि प्रगत संविधान जगात दुर्मिळ आहे. संविधानाने दिलेले हक्क व अधिकार टिकविणे आणि त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. दर्शना धोंडे (बारवकर) यांनी संविधानाच्या निर्मिती इतिहासासह महत्वाच्या घटकांवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधानाची माहिती जाणून घेतली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज परिवर्तन संस्थेचे मोहन शिरसाठ यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचा समारोप भारतीय संविधानाची उद्देशिका वाचून आणि संविधानाबद्दल आदर व्यक्त करून करण्यात आला. समाज परिवर्तन संस्थेतर्फे वेदिका नर्सिंग कॉलेजला भारतीय राज्यघटनेची प्रत भेट देण्यात आली. सिस्टर लता कांबळे यांनी आभार मानले.
