विविध विद्यापीठातुन उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी योगदान देणारे ज्ञानवंत, गुणवंत, आदर्श व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय डॉ. एस.बी. निमसे सर! प्राचार्य, डिन, चेअरमन, संचालक अशा अनेक पदावर कार्य करून थेट दोन विद्यापीठाचे कुलगुरू पद ज्यांनी भुषविले असे अहिल्यानगरचे सुपुत्र डॉ. निमसे सर आज त्यांच्या वयाची 75 वर्षे पुर्ण करीत आहेत. त्यांना उदंड आयुष्य, आरोग्य, आनंद व समाधान लाभावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
सर नगर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स ॲन्ड सायन्स या कॉलेजमध्ये प्राचार्य होते तेंव्हा आमची ओळख झाली. ‘स्त्री जन्माचे स्वागत’ या विषयीच्या कार्यशाळा महाराष्ट्रातील अनेक कॉलेजमधुन मी घेत होते त्यात सरांच्या कॉलेजचाही सक्रिय सहभाग होता. स्त्रीभ्रुणहत्या थांबावी यासाठी ‘स्त्री जन्माचे स्वागत’ हा संस्कार तरूणपिढीमध्ये रूजविण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासहीत महाराष्ट्रात अनेक कॉलेजमध्ये सरांच्या मदतीने कार्यशाळा घेण्यात आल्या.
सरांचे सामाजिक कार्यातील योगदान ही महत्वपूर्ण आहे. रोटरीच्या माध्यमातून पोलिओ निर्मूलन, पर्यावरण संवर्धन, अनेक आरोग्य शिबीरे, अनेक कार्यशाळा-मेळावे, शैक्षणिक उपक्रम सरांनी यशस्वी केले. नगर शहराच्या विकास व्हावा यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले.
चार दशकापासून अधिक शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य वाखाण्याजोगे आहे. आजच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात ‘कुलगुरू’ व शिक्षण व विकास’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन होत आहे. पुस्तक म्हणण्यापेक्षा याला ग्रंथच म्हणावे लागेल. अत्यंत अभ्यासपूर्वक रितीने या ग्रंथाची निर्मिती झाली आहे. हे ग्रंथ सातत्याने समाजाला मार्गदर्शन करीत राहतील.
ज्ञानाची शिदोरी, अनुभवाची श्रीमंती व समाजाची सेवा करण्याची उर्मी असणार्या या व्यक्तीमत्वाला सलाम! अमृत महोत्सवी वर्षात शतायुषी होण्याचे वरदान परमेश्वराकडून मिळावे हीच प्रार्थना!
-डॉ. सुधा कांकरिया
(‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ चळवळीच्या आद्यप्रवर्तक
आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकन )
