17 प्रभागातील इच्छुकांना उपस्थित राहण्याचे आवाहन; पक्षात उमेदवारीसाठी चाचपणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीच्या सोडतीनंतर आता बहुतांश प्रभागातील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले आहे. विविध पक्षांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची चढाओढ सुरू झाली असून, शिवसेनेच्या वतीने सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. या मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे व शहर प्रमुख सचिन जाधव यांनी केले आहे.
या मुलाखतीला टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता प्रारंभ होणार आहे. सर्व इच्छुकांनी नियोजित वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. या मुलाखती शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, यावेळी पक्ष निरीक्षक, राज्य प्रवक्ते संजीव भोर, शहर प्रमुख सचिन जाधव आणि संभाजी कदम उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 11 वाजता या मुलाखतींना प्रारंभ होईल आणि महापालिकेच्या सर्व 17 प्रभागांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती टप्प्याटप्प्याने घेतल्या जातील. महापालिका निवडणुकीची सोडत जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्षात उमेदवारीसाठी चाचपणी सुरू झाली आहे. शिवसेनेत अनेक कार्यकर्ते आपली ताकद दाखविण्यास उत्सुक असून, स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण आले आहे.
मुलाखतीदरम्यान सर्व उमेदवारांना त्यांच्या कामाचा आढावा, प्रभागातील जनसंपर्क, स्थानिक समस्या व विकासाच्या कल्पना याबाबत माहिती देण्याची संधी दिली जाणार आहे. मुलाखतींच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागासाठी योग्य, सक्षम आणि जनतेच्या मनातील उमेदवार निश्चित करण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे.
या मुलाखतींद्वारे पक्षनिष्ठा, जनाधार, कामकाजाचा अनुभव आणि स्थानिक लोकप्रियता यांचा विचार करून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाला मजबूत उमेदवार उभे करायचे आहेत. जनतेच्या सेवेसाठी, स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आणि पक्षाच्या विचारधारेनुसार काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच संधी दिली जाणार असल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली.
