• Thu. Nov 13th, 2025

भटके कुत्रे व मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी समाजवादीचा रास्ता रोकोचा इशारा

ByMirror

Nov 12, 2025

महापालिका आयुक्तांना स्मरणपत्र; नागरिकांची सुरक्षितता धाब्यावर बसवल्याचा आरोप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या व मोकाट जनावरांच्या त्रासामुळे नागरिकांचे जीवन त्रस्त झाले असून, या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या वतीने महापालिका आयुक्तांना स्मरणपत्र देण्यात आले. हा प्रश्‍न तातडीने न सोडविल्यास 17 नोव्हेंबर रोजी महापालिके समोर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन यांनी दिला आहे.


शहरात भटके कुत्रे व मोकाट जनावरे रस्त्यावर हिंडत असल्याने नागरिक, शालेय विद्यार्थी व वृद्ध यांना नेहमीच धोका निर्माण होत आहे. या समस्येवर उपाययोजना व्हावी म्हणून 13 ऑगस्ट रोजी समाजवादी पक्षाने उपायुक्तांना निवेदन दिले होते. त्या वेळी उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी सांगितले होते की, महापालिकेतर्फे नेमलेल्या ठेकेदारामार्फत दररोज कुत्रे व मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम सुरू आहे, त्यामुळे आंदोलन करू नका. मात्र, या आश्‍वासनाला आता तीन महिने उलटून गेले असले तरी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. शहरातील गल्लीबोळ, चौक, बाजारपेठा आणि शाळांच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर कायम आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढत असून, अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनाही घडल्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


हा विषय नागरिकांच्या सुरक्षेशी निगडीत प्रश्‍न आहे. या मागचे ठेकेदार आणि प्रशासनातील गौडबंगाल उघड व्हायला हवा. महापालिकेने तातडीने भटक्या कुत्र्यांचे निर्बंध करावेत, प्रत्येक प्रभागात कुत्रे पकडण्याची नियमित मोहीम राबवण्याचे म्हंटले आहे.


समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन यांनी सांगितले की, महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. आठ दिवसांच्या आत भटके कुत्रे पकडून त्यांना डॉग शेल्टरमध्ये ठेवावे, त्यांची नसबंदी करून पुन्हा शहरात सोडू नये. यासंदर्भात आयुक्तांनी खुलासा करावा. अन्यथा 17 नोव्हेंबरला महापालिका समोर रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *