• Thu. Nov 13th, 2025

रामवाडीतील कामगार वर्गाच्या आरोग्यासाठी आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु

ByMirror

Nov 12, 2025

माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते लोकार्पण


रामवाडीतील आरोग्यवर्धिनी केंद्र गोरगरीब आणि कामगार वर्गासाठी आधार ठरणार -अभिषेक कळमकर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी झोपडपट्टी परिसरातील गोरगरीब व कष्टकरी नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजने अंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्राचे’ लोकार्पण माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य तपासणी, लसीकरण तसेच प्रतिबंधक उपचार सुविधा मोफत उपलब्ध होणार आहेत.


या प्रसंगी माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतचे जिल्हा समन्वयक विकास उडाणशिवे, डॉ. अकशा सोनार, परिचारिका रोहिणी बोरुडे, किरण सपकाळ, चंद्रकांत उजागरे, रोहन शेलार, प्रमोद आढाव, राहुल घोरपडे, अक्षय भालेराव, गौरव शेटे, अनिस शेख, ज्येष्ठ कचरा वेचक इंदुबाई गायकवाड, तसेच विकास वाल्हेकर, सचिन साबळे, मनोहर चखाले, सिंधूबाई साबळे, कलिंदा धाडगे, इंदूबाई कांबळे, लंकाबाई शिंदे, अनुसय्या सोनवणे यांच्यासह कचरा वेचक महिला व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अभिषेक कळमकर म्हणाले की, रामवाडी परिसरात कार्यान्वित झालेले हे आरोग्यवर्धिनी केंद्र हा परिसरातील गोरगरीब आणि कामगार वर्गासाठी मोठा दिलासा आहे. दैनंदिन कामाच्या व्यापात हा वर्ग स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे किरकोळ आजार पुढे गंभीर रूप धारण करतात. या केंद्राच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य तपासणी वेळेवर होईल आणि मोठ्या आजारांचे धोके टाळता येतील.


ते पुढे म्हणाले की, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतचे समन्वयक विकास उडाणशिवे यांनी सातत्याने पाठपुरावा करीत हा प्रश्‍न मार्गी लावला. कचरावेचक महिलांचे आणि कामगार वर्गाचे आरोग्याचे प्रश्‍न सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. या आरोग्य केंद्रामुळे त्यांच्या आरोग्य समस्यांना दिलासा मिळणार असल्याचेही कळमकर म्हणाले.


विकास उडाणशिवे म्हणाले की, या केंद्राच्या माध्यमातून परिसरातील लसीकरण मोहिमा, साथीचे आजार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय आणि प्राथमिक उपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे. रामवाडी झोपडपट्टीतील नागरिकांच्या आरोग्य समस्यांचे निराकरण होईल. महापालिका आयुक्त यशवंत डांगे व आरोग्य अधिकारी सतीश राजूरकर यांनी या प्रकल्पासाठी विशेष सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम शक्य झाला, असे ते म्हणाले.


रामवाडी झोपडपट्टीतील कचरा वेचक महिला, मजूर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आतापर्यंत योग्य आरोग्य सुविधा सहजासहजी मिळत नव्हत्या. आता या आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून त्यांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीपासून लसीकरणापर्यंत सर्व सेवा एका छताखाली उपलब्ध होतील. महापालिकेला 2021-22 मध्ये 12 आणि 2022-23 मध्ये 6 अशा एकूण 18 आरोग्यवर्धिनी केंद्रांना मंजुरी मिळालेली असून, त्यापैकी रामवाडी केंद्र हे कष्टकरी वर्गासाठी उभारलेले एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *