शिवसेना अनुसूचित जाती विभाग शहर प्रमुख विनोद साळवे यांनी वेधले लक्ष
एमआयडीसीमधील कामगारांच्या मूलभूत सुविधा, सुरक्षा आणि कायमस्वरूपी रोजगाराची हमी मिळण्याची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिवसेना अनुसूचित जाती विभागाचे शहर प्रमुख विनोद साळवे यांनी राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांची भेट घेऊन अहिल्यानगर एमआयडीसी परिसरातील कामगारांचे विविध प्रश्न, त्यांच्या अडचणी तसेच सुरक्षेच्या बाबी यावर सविस्तर चर्चा केली. उद्योग मंत्री सामंत संगमनेर येथे आले असता साळवे यांनी निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
एमआयडीसी क्षेत्रात अनेक लघु-मध्यम उद्योग कार्यरत आहेत. या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना अपुऱ्या सुविधांचा, अस्थिर रोजगाराचा आणि सुरक्षेच्या अभावाचा सामना करावा लागत आहे. विशेषतः काही कारखान्यांमध्ये किमान वेतन, वैद्यकीय सुविधा, सुरक्षित कार्य वातावरण आणि नियमित कामकाजाच्या अटींची अंमलबजावणी योग्य रीतीने होत नसल्याची तक्रार साळवे यांनी मंत्री सामंत यांच्यासमोर मांडली. यावेळी आमदार अमोल खताळ, जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, शिवसेना अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे, रावसाहेब काळे पाटील आदी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
साळवे यांनी सांगितले की, अहिल्यानगर एमआयडीसी हा जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीचा कणा आहे. परंतु कामगारच या क्षेत्राचे खरे आधारस्तंभ असून, त्यांची परिस्थिती सुधारल्याशिवाय औद्योगिक विकासाला वेग येणार नाही. त्यामुळे शासनाने एमआयडीसीमधील कामगारांच्या मूलभूत सुविधा, सुरक्षा आणि कायमस्वरूपी रोजगाराची हमी यासाठी ठोस पावले उचलावीत.
या भेटीला उद्योगमंत्री सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संबंधित अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष अहवाल मागवून लवकरच आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
