सामाजिक कार्यकर्ते सुमित लोंढे यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन
कार्यवाही न झाल्यास महापालिकेत मोकाट कुत्रे सोडण्याचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव उपनगरात सध्या मोकाट कुत्र्यांचा अक्षरशः उच्छाद माजला असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात त्रास वाढला आहे. केडगाव उपनगर, रेल्वे स्टेशन परिसर, दूधसागर, इंदिरा नगर, हनुमान नगर, मोहिनी नगर, कांबळे मळा, कायनेटिक चौक या परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रात्रीच्या वेळी हे कुत्रे नागरिकांच्या मागे धावणे, रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना घाबरवणे, लहान मुलांच्या अंगावर झेप घेणे, तसेच रात्री सतत भुंकने यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुमित संजय लोंढे यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची, त्यांचे निर्बिजीकरण करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक भितीच्या सावटाखाली असल्याबाबत त्यांनी मनपा आयुक्तांचे लक्ष वेधले.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, केडगाव उपनगरात अनेक नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडलेल्या आहेत. रस्त्यांवरील कचऱ्यात हे कुत्रे घोटाळून तो पसरवतात, त्यामुळे अस्वच्छता वाढते. यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होत असून, नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिका प्रशासनाकडून यापूर्वीही काही प्रमाणात कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले असले तरी ते अपुरे ठरले आहे. शहर व उपनगरातील वाढती लोकसंख्या आणि कचऱ्याचे अनियंत्रित व्यवस्थापन यामुळे मोकाट कुत्र्यांची वाढ होत असल्याचेही लोंढे यांनी निदर्शनास आणून दिले. जर महापालिकेने तातडीने या संदर्भात कारवाई केली नाही, तर आम्ही संबंधित कुत्रे थेट महापालिका कार्यालयात आणून सोडणार आहोत. प्रशासनाने जबाबदारी टाळू नये, ही लोकांच्या सुरक्षेची बाब असल्याचा इशारा त्यांनी दिला.
मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून नियमित निर्बिजीकरण मोहिम, रस्त्यांवरील कचरा व्यवस्थापन सुधारणा, प्राणीसंवर्धन केंद्रांमार्फत आश्रय व्यवस्था या तातडीच्या उपायांची आवश्यकता असल्याचे म्हंटले आहे.
