शहर स्वच्छ, निरोगी आणि सुंदर बनविण्यासाठी औषध विक्रेत्यांचा पुढाकार
आपले शहर स्वच्छतेने सुंदर व आरोग्यदायी होणार -दत्ता गाडळकर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सुंदर आणि स्वच्छ अहिल्यानगर घडविण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनने यामध्ये सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गुरुवार, दि. 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 वाजता शहरातील स्वच्छता अभियानात केमिस्ट असोसिएशनचे सर्व सभासद सहभागी होणार आहेत. तर नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणार आहेत.
या उपक्रमात सहभागी होत असल्याचे पत्र महानगरपालिकेचे उपायुक्त संतोष टेंगळे यांना असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर आणि सचिव मनीष सोमानी यांनी दिले. या प्रसंगी असोसिएशनचे सहसचिव महेश आठरे, खजिनदार मनोज खेडकर आदी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
महानगरपालिकेने शहरात सुंदर अहिल्यानगर हे अभियान हाती घेतले असून, त्याचाच एक भाग म्हणून केमिस्ट असोसिएशनने या उपक्रमाला आपला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. या मोहिमेअंतर्गत गुरुवारी बंगाल चौकी पासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात होणार आहे. जुना बाजार रोड, माणिक चौक, बारातोटी कारंजा या भागांमध्ये स्वच्छता करण्यात येणार असून, असोसिएशनचे सर्व सभासद हातात झाडू घेऊन प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून सहभाग नोंदवणार आहेत. असोसिएशनने केवळ स्वच्छता मोहिमेत भाग घेण्यापुरतेच नव्हे, तर नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे ठरवले आहे.
आपले शहर केवळ सुंदरच नव्हे तर आरोग्यदायी असावे, यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात केली पाहिजे, असे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांनी सांगितले. सचिव मनीष सोमानी यांनी औषध व्यवसाय हा आरोग्याशी निगडित आहे. म्हणूनच समाजात स्वच्छतेचा संदेश पोहोचविणे ही आमची सामाजिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत केमिस्ट असोसिएशनचे कौतुक केले. उपायुक्त टेंगळे यांनी सांगितले की, शहरातील प्रत्येक घटकाचा सहभाग मिळाल्यास ‘सुंदर अहिल्यानगर’ हे स्वप्न नक्कीच साकार होण्यास मदत होणार आहे.
