• Sun. Nov 2nd, 2025

महाड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 68 वा वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन

ByMirror

Nov 1, 2025

स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले करणार मार्गदर्शन


बाबासाहेबांच्या विचारांना स्मरण आणि चळवळीला नवचैतन्य देणारा सोहळा ठरणार -सुनिल साळवे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा 68 वा वर्धापन दिन ऐतिहासिक महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रह क्रांतीभूमीवर साजरा होणार आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. 3 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3.00 वाजता आयोजित करण्यात आला असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडणार आहे.


या कार्यक्रमात अहिल्यानगर शहर, जिल्हा व तालुक्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी केले आहे.


महाडच्या चवदार तळ्याची क्रांतीभूमी ही भारतीय सामाजिक इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण जागा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली इथूनच समानता आणि मानवतेचा संदेश दिला गेला होता. त्या पवित्र भूमीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा हा 68 वा वर्धापन दिन साजरा होत असल्याने या सोहळ्याला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.


या कार्यक्रमासाठी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अविनाश मातेकर, राष्ट्रीय अध्यक्षा सीमाताई आठवले, युवा नेते जीत आठवले, प्रदेशाध्यक्ष राजेश सरवदे, प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे, राज्य उपाध्यक्ष व संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, तसेच राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पुढील वाटचालीचा आणि आगामी निवडणूक धोरणाचा आराखडा सादर केला जाणार आहे.


रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. लवकरच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार असल्याने, या मेळाव्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, निवडणुकीतील रणनीती ठरविणे आणि समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाचे पुढील पाऊल निश्‍चित करणे, या मुद्द्यांवर आठवले मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सुनील साळवे यांनी दिली.


जिल्हाध्यक्ष साळवे यांनी सांगितले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महाड येथील चांदे मैदान, क्रांतीभूमी, तालुका महाड, जिल्हा रायगड येथे होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. हा केवळ वर्धापन दिन नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना स्मरण आणि समाज परिवर्तनाच्या चळवळीला नवचैतन्य देणारा सोहळा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *