• Wed. Oct 29th, 2025

सोनईतील युवकाच्या अमानुष हल्लाप्रकरणी सर्व आरोपी अटक करा

ByMirror

Oct 29, 2025

घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाईची मागणी


स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ, मुस्लिम समाज, मातंग समाज आणि ख्रिश्‍चन समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सोनई (ता. नेवासा) येथे मातंग समाजातील तरुण संजय नितीन वैरागर याच्यावर झालेल्या प्राणघातक आणि अमानुष हल्ल्यातील सर्व आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समस्त स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ, मुस्लिम समाज, मातंग समाज आणि ख्रिश्‍चन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.


या समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी सुशांत म्हस्के, अजीम खान, रोहित आव्हाड, संदीप वाघमारे, प्रतीक बारसे, संजय कांबळे, संदीप वाघचौरे, दानिश शेख, विशाल भिंगारदिवे, सागर चाबुकस्वार, सिध्दांत कांबळे, सिद्धार्थ भिंगारदिवे, सुजित घंगाळे, हरीश अल्हाट, खालिद शेख, यासर शेख, खलील शेख, सागर चाबुकस्वार, विजय शिरसाठ, शहेबाज हाजी, मोसिन शेख, स्वप्निल साठे, जुनेद शेख, समीर शेख, गणेश साठे, नईम शेख, गुलाम शेख, अमित काळे, अजय पाखरे आदी उपस्थित होते.


दिनांक 19 ऑक्टोबर रोजी, सोनई येथे संजय वैरागर या तरुणाला उचलून नेऊन निर्दयपणे मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे, तर त्याच्या अंगावर स्कॉर्पिओ गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, तसेच अंगावर लघवी करून थुंकणे यांसारख्या अमानुष कृत्यांद्वारे त्याचा छळ करण्यात आला.


या घटनेमुळे माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आरोपी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते असून, त्यांचा गुन्हेगारी पार्श्‍वभूमीशी संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मागासवर्गीय आणि आदिवासी कुटुंबांवर जातीय प्रवृत्तीने हल्ले करण्याचा त्यांचा पूर्वेतिहास असल्याचेही शिष्टमंडळाने निदर्शनास आणले.


शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींना मोक्कांतर्गत कारवाई करून त्वरित अटक करण्यात यावी. पीडित तरुण संजय वैरागर याच्यावर दाखल करण्यात आलेला खंडणीचा खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा. सध्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वैरागर यांना हिंदुत्ववादी संघटनेच्या प्रमुखांनी भेट देऊन गुन्हा मागे घेण्यासाठी धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. तसेच पीडित कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.


या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत मातंग, आंबेडकरी, मुस्लिम आणि ख्रिश्‍चन समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *