रिपाईच्या वतीने निषेध; आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी
लोकशाहीची गळचेपी करुन समाजात जातीय विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न -अमित काळे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सोनई (ता. नेवासा) येथील मातंग समाजातील तरुण संजय नितीन वैरागर याच्यावर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जीव घेण्याच्या उद्देशाने अमानुष हल्ला केल्याची घटना घडली असून, या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. जखमी संजय वैरागर याला गंभीर अवस्थेत अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपाईच्या शिष्टमंडळाने रुग्णालयात भेट देऊन त्याच्या कुटुंबीयांना धीर दिला.
यावेळी रिपाई (आठवले) युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, युवक जिल्हा सचिव दया गजभिये, माजी सरपंच युवराज पाखरे, युवक तालुका सचिव निखिल सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य शनेश्वर पवार, युवक तालुका उपाध्यक्ष अजय पाखरे, रवी सूर्यवंशी, अमर बडेकर आदी उपस्थित होते.
संजय वैरागर याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आला असून, डोळ्यावर गंभीर इजा झाली आहे. अंगावरून टू-व्हीलर व फोर-व्हीलर वाहन घालण्यात आल्याने त्याचे पाय मोडले आहेत. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा डोळा कायमस्वरूपी निकामी होण्याची शक्यता आहे.
रिपाईचे जिल्हाध्यक्ष अमित काळे म्हणाले की, समाजात हिंदुत्ववादाचा बुरखा पांघरून लोकशाहीची गळचेपी सुरू आहे. मागासवर्गीय समाजावर अन्याय करून जातीय विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मातंग समाजातील युवकावर झालेला हा क्रूर हल्ला मानवतेला काळीमा फासणारा आहे. हल्ला डोळा व पाय निकामी करण्याच्या उद्देशाने झाला असून, तीक्ष्ण हत्यारांचा वापर करण्यात आला आहे. रिपाई या घटनेचा तीव्र निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.
रिपाईने जिल्हा प्रशासनाकडे सर्व 11 आरोपींना तात्काळ अटक करून वैरागर कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. अन्यथा जिल्ह्यातील आंबेडकरवादी, पुरोगामी संघटना व रिपाईच्या माध्यमातून अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
जखमीची आई मंगल नितीन वैरागर यांनी सांगितले की, आरोपींनी पूर्वीही माझ्या मुलाला मारहाण केली होती. त्यावेळी आम्ही पोलिस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेलो असता, पोलीसांनी तक्रार नाकारली. पोलिस प्रशासनाने वेळेवर कारवाई केली असती, तर आज हा जीवघेणा हल्ला झाला नसता. पोलिस प्रशासन जातीयवादी शक्तींना पाठबळ देत आहे, असा आरोप त्यांनी केला.
