• Sun. Oct 26th, 2025

दिवाळीचा पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण

ByMirror

Oct 20, 2025

शिवप्रेमींच्या जयघोषात दीपोत्सव सोहळा रंगला

हा दीपोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा उत्सव -अनिता काळे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वाभिमानी महाराष्ट्र घडविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी दिवाळीचा पहिला दिवा अर्पण करून अहिल्यानगरात दिवाळी उत्सवाची तेजोमय सुरुवात करण्यात आली. मराठा सेवा संघ, मराठा समन्वय परिषद आणि जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 20 ऑक्टोबर) शहरातील जुने बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याभोवती दीपोत्सव साजरा करण्यात आला.
लखलखत्या पणत्यांनी उजळलेल्या पुतळ्याभोवती जय भवानी, जय शिवाजी!…, जय जिजाऊ जय शिवराय…, जय शंभूराजे… चा जयघोष दुमदुमला. या दीपोत्सवात मोठ्या संख्येने शिवप्रेमी, महिला आणि युवक-युवतींनी सहभाग घेत, महाराजांना दीपांजली वाहिली.


या कार्यक्रमास मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा ॲड. स्वाती जाधव, अलकाताई मुंदडा, ॲड. अनुराधा येवले, हेमा पडोळे, मेघना मुनोत, लीला अग्रवाल, रेखा मैड, विद्या कुलकर्णी, जयश्री गिरवले, उषा काळभोर, करुणाताई काळे, मिनाक्षी जाधव, वैशाली उदावंत, तसेच गोरख दळवी, गोरक्षनाथ पठारे, सागर भोसले, मनोज सोनवणे, वैभव कोकाटे, सिध्दांत पानसरे, भारत भोसले, मनोज बारस्कर, रमेश मुंगसे, संतोष हराळ, अभिजीत हराळ, संदीप नवसुपे, रामदास सातपुते, निलेश सुंबे आदी शिवप्रेमी उपस्थित होते.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती लावलेल्या पणत्यांच्या प्रकाशाने परिसर उजळून निघाला होता. उजेडात न्हालेला महाराजांचा पुतळा आणि जयजयकाराच्या निनादात दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.
अनिता काळे म्हणाल्या की, दिवाळी म्हणजे बळीराजाचा उत्सव. पण या उत्सवात आपण बळीराजाचेच नव्हे, तर बळीराजाचे राज्य स्थापन करणारे आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनाही दीप अर्पण करून खरी दिवाळी साजरी करीत आहोत. हा दीपोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा उत्सव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सुरेश इथापे म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या तेजोमय कार्याला साक्ष देणारा हा दीपोत्सव म्हणजे स्वराज्याच्या स्मृतींना उजाळा देणारा सोहळा आहे. शिवरायांच्या आदर्शाने समाजात एकता, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जागविणे हेच यामागचे उद्दिष्ट आहे. लखलखत्या पणत्यांच्या झगमगाटात शिवरायांच्या चरणी अर्पण झालेला पहिला दिवा म्हणजे स्वराज्याचा, संस्कृतीचा आणि अभिमानाचा दीप असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *