• Wed. Oct 29th, 2025

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला, सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधात भाकपची निदर्शने

ByMirror

Oct 16, 2025

लोकशाहीवरील हल्ला थांबवा!; न्यायसंस्थेचा अपमान आणि लोकशाहीची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर खुल्या न्यायालयात झालेल्या बूटफेकीच्या घटनेचा आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या बेकायदेशीर अटकेचा निषेध म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) वतीने गुरुवारी (दि. 16 ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.


या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी लोकशाही वाचवा, न्यायसंस्थेचा अपमान थांबवा, सोनम वांगचुक यांना मुक्त करा! अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला. या आंदोलनात भाकपचे राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे, कॉ. स्मिता पानसरे, किसान सभेचे कॉ. बन्सी सातपुते, आयटकचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. सुधीर टोकेकर, कॉ. आप्पासाहेब वाबळे, भारत अरगडे, भारती न्यालपेल्ली, प्रा. डॉ. सुभाष कडलग, कॉ. सतीश पवार, सगुना श्रीमल, संगीता कोंडा, लावण्या न्यालपेल्ली, कॉ. सुनील दुधाडे, राजेंद्र व्यवहारे, यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.


भाकपच्या नेत्यांनी केंद्र व राज्य सरकार लोकशाहीची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप करत सरन्यायाधीशांवरील हल्ल्याला न्यायव्यवस्थेवरील थेट हल्ला म्हटले. सर्वोच्च न्यायालयासारख्या सर्वोच्च संस्थेवर अशा प्रकारे बूटफेक होणे हे भारतीय संविधान आणि न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. या घटनेतील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे; अन्यथा असा प्रकार वारंवार घडण्याचा धोका स्पष्ट केला.


यावेळी आंदोलनकर्त्यांनी शिक्षणतज्ञ आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) अंतर्गत करण्यात आलेल्या अटकेचा तीव्र निषेध नोंदवला. त्यांच्या म्हणण्यानुसार, सोनम वांगचुक हे पर्यावरण, शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी अहिंसक मार्गाने लढणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या अटकेने लोकशाही मूल्यांचा घोर अपमान झाला असल्याचे म्हंटले आहे.


सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूटफेक करणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी व सोनम वांगचुक यांच्यावर लादलेला एनएसए कायदा मागे घेऊन त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी भाकपच्या वतीने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *