3 टक्के महागाई भत्ता समाविष्ट करून; शासन आदेश तात्काळ काढावेत -बाबासाहेब बोडखे
मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना निवेदन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव आणि शिक्षण आयुक्तांना निवेदन पाठवून ऑक्टोबर 2025 महिन्याचे नियमित वेतन तसेच सेवानिवृत्ती वेतन दिवाळीपूर्वी 3 टक्के वाढीव महागाई भत्त्यासह वितरित करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. याबाबत शासनाने शासनाने तातडीने आदेश निर्गमित करण्याच्या मागणीचे निवेदन माजी शिक्षक आमदार तथा राज्य कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव व शिक्षण आयुक्तांना पाठविल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने जुलै 2025 पासून तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला असला, तरी अद्याप त्याचा लाभ अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. म्हणूनच ऑक्टोबर 2025 चे वेतन आणि सेवानिवृत्ती वेतन देताना वाढीव महागाई भत्ता समाविष्ट करावा, अशी शिक्षक परिषदेची मागणी आहे.
दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा आनंदोत्सव असून, 18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2025 दरम्यान हा सण उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षक व निवृत्त कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी संपूर्ण वेतन मिळणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.