बाजारपेठेतील प्रश्न सोडविल्याबद्दल आमदार जगताप यांचा सत्कार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील कापड व्यापारी संघाच्या स्थापनेचा 75 वा अमृत महोत्सव कोजागिरी पौर्णिमेला साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप उपस्थित होते.
आमदार जगताप यांनी आनंदधाम येथील चौपाटीचे योग्य ठिकाणी स्थलांतर करून त्या परिसराचे पावित्र्य राखले तसेच लहान व्यापाऱ्यांच्या रोजंदारीचा समन्वय साधला. अहिल्यानगरच्या मुख्य बाजारपेठेतील स्वच्छतागृहाची गरज आणि पार्किंगच्या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी अत्याधुनिक प्रकल्पाला मंजुरी मिळवून देऊन, त्यांनी व्यापारी वर्गाची अनेक दशकांची मागणी पूर्ण केली. या योगदानाबद्दल कापड व्यापारी संघाच्या वतीने त्यांचा विठ्ठल-रुक्मिणी प्रतिमा व गो मातेची मुर्ती देऊन पगडी, शालने सत्कार करण्यात आला.
आमदार जगताप यांनी भविष्यातील अनेक विकास प्रकल्पांविषयी माहिती देत, नगरची बाजारपेठ अधिक सुसज्ज, सुदृढ आणि व्यापारासाठी अनुकूल बनेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमात संघाचे उपाध्यक्ष सचिनजी चोपडा, राजेंद्रजी गांधी, सेक्रेटरी मुकेशजी अरोरा, रजनीकां गांधी, संजय चोपडा तसेच संस्थेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी भाग्यवान विजेत्यांसाठी सोडत काढण्यात आली. यामधील विजेत्यांना आमदार जगताप यांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले.