• Tue. Oct 14th, 2025

अहिल्यानगर जिल्ह्यात मोफत उद्योजकता प्रशिक्षण उपक्रम

ByMirror

Oct 9, 2025

युवक-युवतींना व्यवसाय उभारणीची संधी


डाटा एन्ट्रीपासून ड्रोन प्रशिक्षणापर्यंत; जिल्हा उद्योग केंद्र व एमसीईडीचा प्रशिक्षण उपक्रम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वसाधारण घटक व विशेष घटक योजनेअंतर्गत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


या प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विविध व्यावसायिक क्षेत्रांतील प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यात डाटा एन्ट्री ऑपरेटर, फॅशन डिझाईनिंग, ब्युटी पार्लर, बेकरी प्रॉडक्ट्स, हॉटेल मॅनेजमेंट, ड्रोन ऑपरेशन, तसेच दुचाकी आणि तीन चाकी वाहन दुरुस्ती अशा विविध विषयांचा समावेश आहे.


या उपक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील सुशिक्षित युवक-युवतींना स्वावलंबी बनवणे आणि कौशल्यविकासाद्वारे त्यांना व्यवसाय व उद्योजकतेकडे वळवणे हा आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहभागी प्रशिक्षणार्थींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्‍यक मार्गदर्शन देखील दिले जाणार आहे.


सदर प्रशिक्षणासाठी अर्जदार किमान आठवी उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. तसेच वय 18 ते 45 वर्षांदरम्यान असावे. त्यासोबतच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रबळ इच्छा शक्ती असणे अपेक्षित आहे.


या उपक्रमाबाबत माहिती देताना जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दीपक शिवदास व एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी रमेश जाधव यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. प्रशिक्षणातून मिळणारे कौशल्य हे त्यांच्या उद्योजकतेसाठी भक्कम पायाभूत ठरणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू होणाऱ्या या मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षणामुळे युवकांना केवळ रोजगार मिळणार नाही, तर स्वतःचे उद्योग उभारून इतरांनाही रोजगार देण्याची संधी मिळणार आहे. शासनाच्या स्वावलंबी भारत संकल्पनेला मूर्त रूप देणारा हा उपक्रम असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


अधिक माहिती, अर्ज प्रक्रिया व प्रशिक्षण स्थळांची माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) मार्फत जिल्हा उद्योग केंद्र, अहिल्यानगर मोबाईल क्रमांक 9168667166 येथे संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *