• Tue. Oct 14th, 2025

आरएसएसच्या शताब्दी नाण्याविरोधात पीपल्स हेल्पलाईनची बहिष्काराची हाक,

ByMirror

Oct 6, 2025

संविधानाचा अवमान उपस्थित करुन संविधाननिष्ठ आंदोलनाची घोषणा


धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर मोठे प्रश्‍नचिन्ह -ॲड. कारभारी गवळी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्थापनेच्या शताब्दी निमित्ताने जारी करण्यात आलेल्या 100 रुपयांच्या नाण्यावर पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने बहिष्काराची हाक देण्यात आली आहे. भारताचे प्रजासत्ताक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही या चार अविचल स्तंभांवर उभे आहे. हे मूल्य केवळ घोषवाक्य नसून, स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानातून आणि संविधान निर्मात्यांच्या दृष्टीतून साकारलेले असल्याचे स्पष्ट करुन, सदर नाणे या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर मोठे प्रश्‍नचिन्ह उभे करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात सर्वभारतीय धर्मनिरपेक्ष बहिष्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


स्मारक नाणे हे केवळ आर्थिक व्यवहाराचे माध्यम नसते; ते शासनाच्या विचारसरणीचा, दृष्टिकोनाचा आणि राष्ट्रीय मूल्यांचा प्रतीक असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र भोस, भगतसिंग यांसारख्या सर्वसमावेशक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या स्मरणार्थ जारी करण्यात आलेली नाणी देशातील एकात्मता आणि समता दर्शवतात. मात्र, विशिष्ट विचारसरणीशी निगडित आणि धार्मिक ध्रुवीकरणाशी अनेकदा जोडल्या गेलेल्या संस्थेच्या शताब्दी निमित्ताने स्मारक नाणे जारी करणे हे, राज्य आणि धर्माच्या विभक्ततेच्या संविधानिक तत्त्वाला छेद देणारे असल्याची टीका संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.


धर्मनिरपेक्षता म्हणजे कोणत्याही धर्माचा विरोध नव्हे, तर सर्व धर्मांचा समान आदर राखत राज्याची तटस्थता जपणे. हाच भारताच्या सामाजिक एकात्मतेचा पाया आहे. आरएसएसची विचारधारा धार्मिक-सांस्कृतिक ध्रुवीकरणाशी जोडली जाते, असा आरोप अनेक बुद्धिजीवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. अशा पार्श्‍वभूमीवर या संस्थेला सरकारी पातळीवर सन्मान देणे म्हणजे भारताच्या विविधतेतील ऐक्याला तडा देणे, असे मत ॲड. गवळी यांनी व्यक्त केले आहे.
संविधानावर निष्ठा असलेले सर्व विवेकनिष्ठ नागरिक, शिक्षक, पत्रकार, समाजसेवक, शेतकरी आणि विद्यार्थी यांच्या वतीने सर्वभारतीय धर्मनिरपेक्ष बहिष्कार जाहीर करण्यात आला आहे. हा बहिष्कार कोणत्याही संस्थेविरुद्ध नाही, तो संविधानाच्या आत्म्याच्या रक्षणासाठी आहे. हा आंदोलनात्मक निर्णय भारताच्या धर्मनिरपेक्ष ओळखीचे आणि राज्याच्या तटस्थतेचे संरक्षण करण्यासाठी असल्याचे म्हंटले आहे.


बहिष्कारकर्त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, हे नाणे तातडीने मागे घेण्यात यावे आणि भविष्यात कोणत्याही एका विचारसरणीला किंवा धार्मिक पार्श्‍वभूमीला प्रोत्साहन देणाऱ्या प्रतीकांना राष्ट्रीय सन्मान देऊ नये. राष्ट्रीय नाणी, तिकिटे आणि चिन्हे ही एकता, विविधता आणि सर्वसमावेशकतेची प्रतीक असावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


भारत कोणत्याही एका धर्माचा, जातीचा किंवा विचारधारेचा देश नाही. भारत म्हणजे करुणा, विवेक, बंधुता आणि विविधतेतील एकता.आमचा धर्म म्हणजे मानवता, आमचा विचार म्हणजे संविधान, आणि आमचा मार्ग म्हणजे विवेकनिष्ठ भारत! असल्याचे पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने हाक देण्यात आली आहे. या बहिष्कारासाठी ॲड. गवळी, ॲड. सुरेश लगड, ॲड. अजिंक्य काळे, ॲड. आनंद सूर्यवंशी, ॲड. देशमुख प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *