प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
महानगरपालिका हद्दीतील सर्व दिव्यांगांना नोंदणी करण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महापालिका हद्दीतील दिव्यांगांचा उदरनिर्वाह भत्ता दिवाळीपूर्वी देण्याची मागणी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तर महानगरपालिका हद्दीतील सर्व दिव्यांग बंधू-भगिनींना महापालिकेच्या माळीवाडा येथील आनंदऋषी व्यापारी संकुलातील दिव्यांग कक्षात नोंदणी करण्याचे आवाहन प्रहारचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे, महिला शहराध्यक्षा मनीषा जगताप, पोपटराव शेळके, जिल्हा सचिव हमिद शेख यांनी केले आहे.
केंद्र सरकारचा दिव्यांग हक्क अधिनियम कायदा 1995, 2005 आणि नव्याने झालेल्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाकडे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने अनेक आंदोलने उपोषणे केले. आतापर्यंत जवळजवळ 48 पेक्षा जास्त शासन निर्णय मंजूर झाले आहेत. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेने एकूण उत्पन्नाच्या नव्याने काढलेल्या शासन नियम निर्णयाप्रमाणे 5 टक्के निधी दिव्यांगांच्या स्वयंरोजगार, पुनर्वसन किंवा दिव्यांग यांची आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण किंवा दिव्यांगांना पेन्शन, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक शिष्यवृत्ती आदी कारणांसाठी या निधीचा वापर केला जावा, असे निर्देश दिलेले आहेत.
दिव्यांग व्यक्तीला समाजाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी जन्ममृत्यूच्या धर्तीवर स्वतंत्र अभिलेख बनवून नोंद करणे अनिवार्य असताना सुद्धा बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या अधिकार क्षेत्रातील दिव्यांगांचे स्वतंत्र अभिलेख बनवून परिपूर्ण माहितीसह नोंदणी केलेली नाही. त्यांच्यापर्यंत शासनाच्या दिलेल्या योजना व सवलती दिव्यांग व्यक्तींसाठी असलेली माहिती उपलब्ध जर करून दिली नाही तर कर्तव्यात कसूर केला व गरजू दिव्यांग व्यक्तीला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवून त्यांची फसवणूक केली म्हणून कलम 93 अन्वये 5 ते 50 हजार रुपये व दोन वर्षे शिक्षा या दोन्हीपैकी एक किंवा दोन्हीही शिक्षाची स्पष्ट तरतूद संविधानात करण्यात आलेली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
यासाठी महानगरपालिका हद्दीतील सर्व दिव्यांग बंधू-भगिनींना दिव्यांग कक्षात नोंदणी करावी. नोंदणीसाठी दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, नॅशनल बँकेचे बँक पासबुक अनिवार्य असल्याचे म्हंटले आहे.