जमाते उलमा हिंदचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
जिल्ह्यात वेळोवेळी मुस्लिम समाजाला टार्गेट केले जात असल्याचा आरोप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील माळीवाडा बारातोटी कारंजा भागात घडलेल्या रांगोळी प्रकरणामुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या नावाची जमिनीवर रांगोळीतून विटंबना करण्यात आली असून, या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने संबंधित आरोपी व त्यामागील सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जमाते उलमा हिंदने केली आहे.
या पार्श्वभूमीवर जमाते उलमा हिंदच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात जिल्हा सेक्रेटरी सय्यद खलील, शहराध्यक्ष मौलाना अब्दुल रौफ आलमगिरी, निसार बागवान, हाफिज समीर साब, हाफिज रियाज आलमगिरी, मौलाना इसाक, हाफिज नसीब खान, मौलाना अबूबकर, हाफिज अबुजर, हाफिज इर्शाद, मौलाना शोएब, मौलाना सिद्दिकी, हाफिज फैजान, मौलाना इस्माईल, हाफिज जैद, हाफिज उमेर, हाफिज ऐसान, मौलाना मुक्ती अब्दुल हक, तय्यब भाई मोमीन आदींसह जिल्ह्यातील अनेक उलमा व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, माळीवाडा परिसरात झालेली ही विटंबना केवळ धार्मिक भावना दुखावणारी नसून कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आखलेला कट असल्याचे स्पष्ट आहे. हा प्रकार दंगल प्रवृत्तीला खतपाणी घालणारा असून सार्वजनिक शांततेला तडा देणारा आहे. या घटनेमुळे देशात गंभीर तणाव निर्माण होण्याची शक्यता असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची प्रतिमा मलिन होऊ शकते. त्यामुळे दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई होणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यात वेळोवेळी मुस्लिम समाजाला टार्गेट करून त्यांच्या भावनांचा अनादर करण्यात येत आहे. सातत्याने होणाऱ्या या छळामुळे सामाजिक सलोखा बिघडत असून संविधानाने दिलेल्या समता व न्यायाच्या मूल्यांनाही धक्का पोहोचत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा घटना थांबवण्यासाठी आणि मुस्लिम समाजाविरुद्ध होणारा अन्याय रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस व प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी जमाते उलमा हिंदच्या वतीने करण्यात आली आहे.