पूरग्रस्तांसाठी पेन्शनर्सकडून एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय
200 गट विमा प्रस्ताव मंजूर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशनची भव्य अदालत पार पडली. या बैठकीत दीर्घकाळ प्रलंबित असलेला संगणक कपातीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला, तर 200 गट विमा प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील सर्व पेन्शनर्सनी एक दिवसाची पेन्शन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
पेन्शनर असोसिएशनची अदालत प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी लेखा वित्त विभागातील अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच सर्व पंचायत समितींचे गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते. बैठकीसाठी पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ ठुबे, सरचिटणीस बन्सी उबाळे, कार्याध्यक्ष रावसाहेब पवार, उपाध्यक्ष विनायक कोल्हे, सुखदेव वांडेकर, पोपट इथापे, धोंडीबा गांगर्डे, सोमनाथ कळसकर, बापूसाहेब कर्पे, कारभारी शिकारे, भाऊसाहेब लावरे, ज्ञानदेव थोरात, रामचंद्र ठोंबरे, भाऊसाहेब गोरे, अविनाश गांगर्डे, प्रताप आंब्रे, बेबीताई तोडमल, शामला साठे, गजानन ढवळे, मुरलीधर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी संगणक कपातीचा प्रश्न सोडविण्याबाबत संबंधित विभागाला स्पष्ट सूचना दिल्या. निवडश्रेणीच्या प्रस्तावासंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. हे प्रस्ताव लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
याबाबत माहिती देताना सरचिटणीस बन्सी उबाळे म्हणाले की, निवडश्रेणीसह काही प्रश्न अद्याप प्रलंबित असून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. अध्यक्ष दशरथ ठुबे यांनी म्हणाले की, स्वतःच्या हक्कासाठी संघर्ष करणे जितके आवश्यक आहे. तितकेच सामाजिक जबाबदारी पार पाडणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पेन्शनर्सनी पूरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी एक दिवसाची पेन्शन देण्याचे ठरविले आहे.
संगणक कपातीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कार्याबद्दल सौ. शेख व वाघमारे यांचा गौरव झाला. पेन्शन आस्थापना पारनेरचे रवी म्हस्के यांचाही विशेष सत्कार करून त्यांच्या कामगिरीची दखल घेण्यात आली.