• Wed. Oct 15th, 2025

निमगाव वाघा येथे स्वच्छता ही सेवा अभियानातंर्गत स्वच्छता मोहिम

ByMirror

Sep 30, 2025

विद्यार्थ्यांकडून पथनाट्याचे सादरीकरण, ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ


विकासाचे खरे ध्येय ग्रामस्वच्छतेतूनच साध्य होणार -राजेंद्र देसले

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्वच्छता ही सेवा! या उपक्रमांतर्गत गावातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमादरम्यान शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व विशद करून सर्वांना सार्वजनिक स्वच्छतेची शपथ देण्यात आली. या मोहिमेत ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.


या कार्यक्रमास जिल्हा परिषद जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा नगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र देसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सरपंच उज्वलाताई कापसे, उपसरपंच किरण जाधव, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण पानसंबळ, सदस्य पै. नाना डोंगरे, जलजीवन मिशन समन्वयक रवींद्र ठाणगे, क्षमता बांधणी तज्ञ दिपाली जाधव, विस्तार अधिकारी रामदास दळवी, सोनल बालके, मनीषा शिंदे, संदीप तागडकर, मुख्याध्यापिका शांता नरवडे, प्रभाग समन्वयक संदीप वाबळे, सोसायटीचे चेअरमन अतुल फलके, व्हाईस चेअरमन संजय डोंगरे, अरुण कापसे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


गटविकास अधिकारी राजेंद्र देसले यांनी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना स्वच्छतेची शपथ दिली. ते म्हणाले, सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. यामुळे साथीचे आजार टाळता येतात. गावाच्या स्वच्छतेसाठी मतभेद व राजकारण बाजूला ठेवून एकदिलाने प्रयत्न करावेत. ओला व सुका कचरा वेगळा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्‍यक आहे. विकासाचे खरे ध्येय ग्रामस्वच्छतेतूनच साध्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे म्हणाले की, स्वच्छतेने गावाची पत ठरते आणि प्रतिष्ठा वाढते. स्वच्छ वातावरणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहते. डोंगरे सामाजिक संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या माध्यमातून गावात सातत्याने स्वच्छतेचे उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


गावात सातत्याने स्वच्छता उपक्रम राबवल्याबद्दल गटविकास अधिकारी राजेंद्र देसले यांनी पै. नाना डोंगरे यांचा सत्कार केला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता ही सेवा! या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर केले. नाट्यप्रस्तुतीतून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *