जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवाजी कर्डिले यांना निवेदन
आर्थिक तोटा टाळण्यासाठी संचालक मंडळाचा पुढाकार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने जिल्हा बँकेकडे कॅश क्रेडिटवरील व्याजदरात सवलत देण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी सोसायटीच्या संचालक मंडळाने बँकेचे चेअरमन तथा आमदार शिवाजी कर्डिले यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी चेअरमन आप्पासाहेब शिंदे, संचालक बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, सचिव स्वप्निल इथापे यांच्यासह प्राचार्य सुहास धीवर, रवींद्र हंबर्डे, ज्ञानदेव शिंदे, सुदेश छजलानी, सचिन घोरपडे, ज्ञानेश्वर लबडे, निखिल हिरनवाळे आदी उपस्थित होते.
शिक्षक सोसायटीने जिल्हा बँकेकडून 25 लाख कॅश क्रेडिटची मंजुरी घेतलेली असून, सध्या प्रत्यक्षात 150 कोटी रुपयांच्या आसपासची उचल झालेली आहे. जानेवारी 2024 पासून जिल्हा बँकेने कॅश क्रेडिटचा व्याजदर 12.50 टक्के केला आहे. दुसरीकडे, सोसायटीकडून सदस्यांना केवळ 7 टक्के व्याजदराने कर्जपुरवठा केला जातो. त्यामुळे जिल्हा बँक आणि सोसायटीच्या व्याजदरात तब्बल 5.50 टक्क्यांचा फरक निर्माण झाला आहे.
यामुळे संस्थेला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मागील आर्थिक वर्षात 31 मार्च 2025 अखेर संस्थेने जिल्हा बँकेकडून 134 कोटी 70 लाख रुपयांची कॅश क्रेडिट उचल केली होती. या कर्जाच्या बदल्यात संस्थेला तब्बल 14 कोटी 36 लाख रुपये व्याज द्यावे लागले. याचा थेट परिणाम सभासदांच्या लाभांशावर झाला असून, सभासदांना कमी लाभांश मिळण्याची वेळ आली आहे.
माध्यमिक शिक्षक सोसायटीचे सध्याचे संचालक मंडळ हे तब्बल 25 वर्षांनंतर प्रथमच सत्तेत आले आहे. त्यामुळे सभासदांच्या हिताचे रक्षण करणे आणि आर्थिक तोटा थांबवणे हे त्यांचे प्रमुख कर्तव्य असल्याचे संचालक मंडळाने स्पष्ट केले. संस्थेची नियमित वसुली चालू असल्याने जिल्हा बँकेने व्याजदर कमी करून 12.50 टक्क्यांऐवजी 10 टक्के करावा, अशी मागणी संचालक मंडळाने केली आहे. संस्थेची आर्थिक घडी सुरळीत रहावी व सभासदांना योग्य तो लाभ मिळावा, यासाठी व्याजदर कपात करणे क्रमप्राप्त असल्याचे मत चेअरमन आप्पासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले आहे.