कर्मवीरांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभ -छायाताई काकडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक व प्राथमिक विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शाळेत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या सौ. छायाताई काकडे तर प्रमुख उपस्थितीत प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. लक्ष्मीताई आहेर, माजी प्राचार्य अंगद काकडे, तसेच विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापिका सौ. लक्ष्मीताई आहेर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाजकारणातील योगदानाचा उल्लेख करून त्यांच्या कार्याची आठवण करून दिली. रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रयत्न आजही मार्गदर्शक असल्याचे ते म्हणाल्या.
प्राचार्या छायाताई काकडे म्हणाल्या की, कर्मवीर भाऊराव पाटील हे खऱ्या अर्थाने शिक्षणाचे संत होते. त्यांनी आयुष्यभर अस्पृश्यता, गरिबी आणि अशिक्षितपणा याविरुद्ध लढा दिला. स्वावलंबी शिक्षण हा त्यांचा मंत्र प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरावा. त्यांनी सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळे ग्रामीण भागातील लाखो मुले-मुलींना शिक्षण मिळाले आणि त्यांचे भविष्य घडले. आज आपण जेव्हा शाळेत शिकतो, ज्ञान मिळवतो, तेव्हा या संस्थापकांच्या त्यागाचे स्मरण ठेवणे गरजेचे आहे.
भाऊराव पाटील यांचे जीवन हे कष्ट, त्याग आणि सेवाभाव याचे प्रतीक आहे. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येकाने शिक्षण घेऊन समाजासाठी योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमात शिक्षकांनी कर्मवीरांच्या कार्यावरील विचार मांडले.