उपनगरात क्रीडा मैदाने तयार करुन खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु -आमदार संग्राम जगताप
बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, क्रिकेट व फुटबॉल स्पर्धेत खेळाडूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचा विकास होत असताना उपनगरे झपाट्याने वाढत आहे. उपनगरातील खेळाडूंची सोय होण्यासाठी क्रीडा मैदाने तयार करुन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरु आहे. लवकरच सारसनगर भागात एक अद्यावत क्रीडा मैदान उभारले जाणार आहे. शहरातील विविध क्षेत्रातील खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर आपली कर्तृत्व सिध्द केले असून, विविध स्पर्धेच्या माध्यमातून मैदानी खेळांना चालना मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
शहरात आयोजित करण्यात आलेल्या नगर वेल्थ गेम्स संग्राम चषकचे उद्घाटनाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. वाडिया पार्क क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, उद्योजक अनिल मुरकुटे, राष्ट्रवादी क्रीडा सेलचे शहर जिल्हाध्यक्ष घनश्याम सानप, स्पर्धेचे आयोजक इंजि. केतन क्षीरसागर, प्रा. शहाजी उगले, उद्योजक अमोल गाडे, दीपक वाघ, राष्ट्रीय खेळाडू राजेश पुंडे, प्रशांत पालवे, विद्यासागर पेटकर, डॉ. सौरभ पंडित, समृध्द दळवी, निशिकांत महाजन, बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष कुलकर्णी, इंजि. ओंमकार म्हसे, अॅड. जाधव, पानमळकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून मैदानी स्पर्धा होऊ शकलेल्या नाहीत. कोरोनामुळे खेळांडूंचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी व नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नगर वेल्थ गेम्सच्या माध्यमातून वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, सावेडी येथे क्रिकेट तर तपोवन रोड येथे फुटबॉल स्पर्धा पार पडत आहे. मोबाईलमध्ये अडकलेल्या मुलांना मैदानी खेळाची आवड निर्माण होऊन उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना खेळाच्या सरावात सातत्य ठेऊन स्पर्धेय यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेसाठी जे.एम.आर. इन्फ्रास्ट्रक्चर, रॉस्क बिल्डकॉन, रामकृष्ण इंजीनियरिंग कन्सल्टंट, अहमदनगर डिस्ट्रिक्ट अॅथलेटिक्स असोसिएशन, बॅटल डोअर स्पोर्टस अकॅडमी, फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमी यांचे सहकार्य लाभत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय साबळे यांनी केले. आभार जालिंदर शिंदे यांनी मानले.