जिल्हा कार्यकारिणी जाहीर
मानवाधिकार जपण्यासाठी कार्यकर्त्यांनी सजग रहावे -रविराज साबळे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी पंकज राजेंद्र लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृह येथे नुकत्याच झालेल्या संघटनेच्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
या वेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविराज साबळे व पुणे जिल्हा उपाध्यक्ष विकास दंडवते यांनी लोखंडे यांच्या नियुक्तीची घोषणा करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. या बैठकीत जिल्हा कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष अनिल गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष संदीप कापडे, सचिव शरद महापूरे, उपसचिव दिपक कांबळे, जनसंपर्क अधिकारी संतोष वाघ यांचा समावेश आहे.
प्रदेशाध्यक्ष रविराज साबळे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ ही समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या न्यायासाठी कार्य करणारी संघटना आहे. आपल्या हक्कांसाठी जागरूकता निर्माण करणे व अन्यायाविरोधात लढा उभारणे या ध्येयधोरणाने कार्य सुरु आहे. पंकज लोखंडे यांचे सामाजिक चळवळींमध्ये असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मानवाधिकार संघाच्या माध्यमातून ते वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष पंकज लोखंडे म्हणाले की, जिल्हाध्यक्षपदी निवड करून जो विश्वास माझ्यावर टाकण्यात आला आहे. त्या विश्वासाने अन्यायग्रस्त, पीडित व वंचित जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले जाणार आहे. मानवाधिकारांचे उल्लंघन होऊ नये यासाठी प्रशासन, पोलिस व न्यायव्यवस्थेसोबतही समन्वय साधत संघटना सक्रिय राहणार असल्याचे ते म्हणाले. या बैठकीसाठी विजय जाधव, महिला सेलच्या ज्योती वाघ, सविता हराळ आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.