• Wed. Nov 5th, 2025

ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास; नदीला आलेल्या पाण्यामुळे अनेक वस्त्यांचा गावाशी तुटतो संपर्क

ByMirror

Sep 17, 2025

पावसाने वाळकी येथील लेंडी पुलाची दुरवस्था

सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची तातडीने नवीन पुल उभारण्याची मागणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाळकी परिसरातील लेंडी पूल धोकादायक बनला आहे. पावसाच्या पुराच्या पाण्याने पुलाचा निम्मा भाग वाहून गेला असून ग्रामस्थांना, शालेय विद्यार्थ्यांना व दुग्धव्यवसायिकांना जीव मुठीत धरून वाहतूक करावी लागत आहे. लेंडी पूलावर तातडीने नवीन पूलाला मंजूरी देऊन त्याचे काम सुरु करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी केली आहे.


वाळकी ते दहिगाव या मार्गावर, गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराजवळील हा पूल नेहमीच पावसाच्या पाण्याने धोकादायक ठरत आला आहे. विठ्ठलवाडी, येणारेमळा, कुरणवाडी येथील नागरिकांना वाळकी गावात येण्यासाठी हा पूलच एकमेव मार्ग आहे. मात्र जोरदार पाऊस झाला की या छोट्या पुलावरून पूरस्थिती निर्माण होते व गावाचा संपर्क तुटतो.


ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नदीचे पात्र मोठे असूनसुद्धा पुलाचे बांधकाम लहान केले गेले आहे. त्यामुळे दरवर्षी मुसळधार पावसात पलीकडील वस्त्यांचा गावाशी संपर्क तुटत असतो. काही वेळा नदीला जास्त पाणी आल्याने पुल ओलांडताना एखाद्या व्यक्तीला वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.


गेल्या काही वर्षांपासून नागरिक सतत पाठपुरावा करीत आहेत. त्यानुसार पुलाला तात्पुरती दुरुस्ती व मळमपट्टी करण्यात आली. मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांत संतापाची भावना असून ते नवीन, उंच व मजबूत पुलाची मागणी करत आहेत.


या गंभीर प्रश्‍नावर सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नाकडे राजकारण बाजूला ठेवून लोकप्रतिनिधींना लक्ष द्यावे. पुलाच्या पलीकडे मोठी लोकवस्ती असून, त्यांना दरवर्षी पावसाळ्यात हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. म्हणून तातडीने नवीन पूल मंजूर करून कामाला सुरुवात करण्याचे म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *