अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मानव इतिहासात अनेक साम्राज्ये आली आणि गेली; परंतु राजधर्म या संकल्पनेचा खरा शोध व त्याची अंमलबजावणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, असे मत पीपल्स हेल्पलाइनचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केले.
राजमाता जिजाऊंच्या संस्कारांतून व नॉन-जेनेटिक इन्फॉर्मेशनच्या मार्गदर्शनातून उभारलेल्या शिवराज्याने लोककल्याण, न्याय आणि जबाबदारीचा आदर्श जगासमोर ठेवला. आज जगभरातील लोकशाही व समाजवादी राज्यपद्धती भ्रष्टाचार, बेजबाबदारी, आळस व सत्तेच्या दुरुपयोगामुळे कलंकित होत असताना शिवराज्याचा राजधर्म हा एकमेव जागतिक आदर्श ठरतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
धर्म हा व्यक्ती व समाजाच्या नैतिकता, श्रद्धा व संस्कारांशी निगडित असतो. पण राजधर्म हा केवळ प्रजेच्या सुख-समृद्धी व सुरक्षेसाठी सत्तेचा निःस्वार्थ उपयोग करण्याचा मार्ग आहे. शिवाजी महाराजांचे राजकारण हे धर्माधिष्ठित नव्हते, तर जनाधिष्ठित होते, असेही ॲड. गवळी म्हणाले.
मराठा हा शब्द जात, पंथ वा संकुचित ओळख दर्शवणारा नाही. मराठा म्हणजे राजधर्माचा अनुयायीलोककल्याणासाठी जबाबदार राज्यव्यवस्था निर्माण करणारा. मराठा म्हणजे राजधर्म आणि राजधर्म म्हणजे मराठा, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
जागतिक मराठा राजधर्म परिषदेच्या माध्यमातून पुढील उद्दिष्टे ठरवण्यात आली आहेत. लोकशाही व राज्यकारभारासाठी सार्वत्रिक मार्गदर्शक आराखडा निर्माण करणे. स्वराज्यपालांचा जागतिक मंच उभारून जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या लोकप्रतिनिधी व नेत्यांचे सशक्त नेटवर्क तयार करणे. भ्रष्टाचारविरोधी तत्त्वासाठी पारदर्शकता, जबाबदारी व जनसेवेवर आधारित जनआंदोलन उभारणे. सत्तेची जाणीव वैभवासाठी नव्हे तर प्रजेच्या हितासाठी या मूल्यांवर आधारलेली ठेवणे. शाळा, महाविद्यालये व संशोधन संस्थांतून राजधर्माचा अभ्यास व प्रसार करणे.
या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी जगभर परिषदांचे, परिसंवादांचे व कार्यशाळांचे आयोजन, विद्यापीठांत राजधर्म अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न, लोकप्रतिनिधींसाठी राजधर्म प्रशिक्षण शिबिरे, सामाजिक उपक्रमांना मार्गदर्शन, तसेच संशोधन व प्रकाशनाद्वारे मराठा राजधर्माचा इतिहास व आधुनिक गरजांचा संगम साधण्याची कार्ययोजना आखण्यात आल्याचे प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
जगाला नवा विचार, नवं नेतृत्व आणि नवं मार्गदर्शन हवे आहे; आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा राजधर्मातूनच मिळेल, असा ठाम विश्वास ॲड. गवळी यांनी व्यक्त केला आहे.