जिल्हा शालेय क्रीडा वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकाविले सुवर्ण
युवकांणी व्यसनापासून दूर राहून किमान एक तास शरीरासाठी द्यावा -मनिष ठुबे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने नुकतीच जिल्हा शालेय क्रीडा वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत आरएमटी फिटनेस क्लबचे खेळाडू ऋषिकेश पाचारणे व प्राप्ती म्याना यांनी उत्तुंग कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या या यशाबद्दल आरएमटी फिटनेस क्लबतर्फे उद्योजक तथा क्लबचे संचालक मनिष ठुबे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना मनिष ठुबे म्हणाले की, आजची युवा पिढी मोबाईल व विविध व्यसनांकडे वेगाने झुकत आहे. आरोग्य टिकवायचे असेल तर प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहून दररोज किमान एक तास आपल्या शरीरासाठी द्यावा. शरीर व आरोग्य चांगले असेल, तर विचारसरणीही शुद्ध राहते. योगासने, व्यायाम यामुळे व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा मिळते. तासन्तास मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा तरुणाईने व्यायामाची निवड करावी. असे आवाहन त्यांनी केले. तर स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना प्रशिक्षक रवींद्र सर यांचे मार्गदर्शन लाभले.