नगर तालुका कुस्ती स्पर्धेत पटकाविले प्रथम क्रमांक
युवकांनी मेहनत, शिस्त आणि चिकाटीने खेळात प्रगती साधावी -पै. नाना डोंगरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने रुईछत्तीशी (ता. नगर) येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत निमगाव वाघा येथील कुस्तीपटू संदेश नवनाथ जाधव याने 17 वर्षांखालील वयोगटातील व 80 किलो वजनगटात प्रथम क्रमांक पटकाविला. त्याच्या या यशाबद्दल नगर तालुका तालिम सेवा संघ व नगर तालुका तालिम कुस्तीगीर संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे संदेश जाधव यांची जंगले महाराज आश्रम, कोकमठाण (ता. कोपरगाव) येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सत्कार कार्यक्रमाप्रसंगी नगर तालिम संघ व कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, दूध डेअरीचे चेअरमन भाऊसाहेब जाधव, नवनाथ होले, वैभव पवार, नक्षत्र होले, उपाध्यक्ष पै. संदीप डोंगरे, पै. बाळू भापकर, मेजर शिवाजी पुंड, राजू डोंगरे, भाऊ होळकर, रावसाहेब भुसारे, सुरज निमसे, रोहिदास कांडेकर, अंबादास नाट, अंबादास निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, संदेश जाधव याने मेहनत, चिकाटी आणि शिस्त याच्या जोरावर यश मिळवले आहे. खेड्यापाड्यातील मुलांनी जर सातत्याने सराव केला, योग्य मार्गदर्शन घेतले तर मोठ्या प्रमाणात क्रीडा क्षेत्रात नाव कमावू शकतात.
ग्रामीण भागातील तरुणाईकडे अफाट क्रीडासामर्थ्य असून, त्यांना तालिम संघाच्या वतीने प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे. नगर तालुका तालिम संघ व कुस्तीगीर संघ नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जाधव याने मिळवलेल्या यशाबद्दल उपस्थितांनी अभिनंदन करुन त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.