पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेचे 250 वे शिबिर
142 रुग्णांची तपासणी; 28 रुग्णांवर होणार मोतिबिंदू शस्त्रक्रिया
दृष्टी म्हणजे जीवनाचा खरा प्रकाश -प्रा. भगवान काटे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील कल्याण रोड येथे पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे, संस्थेचे हे 250 वे शिबिर होते.
कल्याण रोडवरील फॅमिली विश्व मॉल येथे पार पडलेल्या या शिबिराचे अध्यक्षस्थान प्रा. भगवान काटे यांनी भूषविले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मेजर शिवाजी वेताळ, सेफ टी इंडस्ट्रीजचे परशुराम कोतकर, अर्थ फेडरल बचत गटाचे चेअरमन विजूभाऊ गाडळकर, राजाराम रोहकले, बाबासाहेब आंधळे, सुभाष बवे, काशिनाथ सुंबे, परवीन शेख, रफिक शेख, भाऊसाहेब थोटे, मांडगे सर, बबन खामकर, बाजीराव चौधरी, मेजर पर्वतराव हराळ, विजय कांडेकर, हौसीराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. भगवान काटे म्हणाले की, पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेने राबवलेला हा उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त आहे. दृष्टी म्हणजे जीवनाचा खरा प्रकाश. एखाद्याचे डोळे वाचविणे म्हणजे त्याला नवे जीवन देणे होय.संस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्यविषयक व सामाजिक उपक्रमांतून उल्लेखनीय कार्य केले आहे. 250 वे शिबिर म्हणजेच समाजसेवेतील एक मोठे योगदान आहे. या कार्यामुळे सामान्य माणसाला आधार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
मेजर शिवाजी वेताळ म्हणाले की, आमच्या संस्थेचे ध्येय नेहमीच समाजाच्या आरोग्यासाठी योगदान देणे राहिले आहे. 250 वे शिबिराच्या माध्यमातून लाखो दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना नवदृष्टी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर हे केवळ वैद्यकीय साहाय्य नव्हे, तर गरजू रुग्णांच्या जीवनात आनंद फुलविणारा उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांनी एकूण 142 रुग्णांची मोफत तपासणी केली, तर 28 रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरासाठी सेफ टी इंडस्ट्रीज लिमिटेड, अर्थ बचत गट आणि के.के. आय. बुधरानी हॉस्पिटल (पुणे) यांचे विशेष सहकार्य लाभले.