गुडघेदुखीवर ज्येष्ठांचा मोफत उपचार व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव
यशवंती मराठा महिला मंडळ व ई-गरुड झेप नैसर्गिक उपचार सेवांचा उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विळदघाट येथील मातोश्री वृद्धाश्रमात यंदा शिक्षक दिनाचा उत्सव आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यशवंती मराठा महिला मंडळ आणि ई-गरुड झेप नैसर्गिक उपचार सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी गुडघेदुखीवर मोफत उपचार शिबिर घेण्यात आले. तसेच वयोवृद्धांना मायेची ऊब देत ब्लँकेटचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून घेतलेला हा सन्मान सोहळा मनाला भावणारा ठरला. यावेळी संस्थापिका मायाताई कोल्हे, जिल्हाध्यक्षा गीतांजली काळे, उपाध्यक्षा सुरेखा खैरे, जिल्हा उपाध्यक्षा कविता दरंदले, सचिव लीना नेटके, गरुड झेपचे संस्थापक वच्छाला शांताराम पवार, व्यवस्थापक सचिन हाडोळे, रोहन तरटे, माजी शहराध्यक्षा आशाताई, तसेच मंगल शिरसाठ, गौरी गुरव, सविता बोरुडे, आशा कांबळे, कल्याणी शेळके, डॉ. श्रृतूला बोरुडे, मेघाताई झावरे, राजश्री पोहेकर, माधवी दांगट, शर्मिला कदम, कविता भावसार आदींसह महिला सदस्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
मायाताई कोल्हे म्हणाल्या की, मातापित्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभले, तर ती जगातील सर्वात मोठी श्रीमंती आहे. आपले आई-वडील हे घररूपी मंदिर असून, या मंदिरात केलेली भक्ती थेट ईश्वरापर्यंत पोहचते. मातोश्री आश्रमामुळे ही सेवा करण्याची संधी मिळाली, हे आमचे भाग्य असल्याचे ते म्हणाल्या.
जिल्हाध्यक्षा गीतांजली काळे यांनी वृद्धाश्रमात केव्हाही मदतीची गरज भासली, तर यशवंतीच्या महिला तत्परतेने धावून येणार असल्याची भावना व्यक्त केली. सुरेखा खैरे यांनी स्पष्ट केले की, यशवंती मराठा महिला मंडळ हे केवळ विरंगुळ्यासाठी नसून समाज बदलासाठी कार्यरत आहे. वंचित व दुर्लक्षित घटकांना आधार देणे, हीच आमची खरी ध्येयपूर्ती असल्याचे सांगितले.
कविता दरंदले यांनी आमच्या येण्याने वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य खुलते, तर हा आनंद वारंवार अनुभवण्यासाठी आम्ही नेहमीच असे उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात शिक्षक शोभा भालसिंग, राजश्री शेळके, मीनाक्षी जाधव, आरती थोरात, सुलक्षणा अडोळे, विद्या काळे, कृपाली ताकटे, सोहनी पुरनाळे व अर्चना बोरुडे यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त मिळालेल्या ब्लँकेटच्या भेटीने वृद्धाश्रमातील महिला भारावल्या. माजी शहराध्यक्षा आशाताई यांनी वृद्धाश्रमातील महिलांना एकत्र राहून आनंदाने जगण्याचा कानमंत्र दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना नेटके यांनी केले. आभार मेघाताई झावरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी मातोश्री आश्रमचे दिलीप सर, गणेश लबडे व दीपक पवार यांचे सहकार्य लाभले.