• Sat. Sep 20th, 2025

आंतरजातीय विवाहाच्या प्रोत्साहनासाठी एंडोगॅमीविरोधी सामाजिक स्वातंत्र्यसैनिकांची नोंदणी अभियान

ByMirror

Sep 4, 2025

पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकार


आंतरजातीय विवाह सामाजिक स्वातंत्र्याचा शस्त्रप्रहार ठरणार -ॲड. कारभारी गवळी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने एंडोगॅमी म्हणजे स्वजात विवाहाची सक्ती तोडून सामाजिक गुलामीतून मुक्त करण्याच्या दिशेने एंडोगॅमीविरोधी सामाजिक स्वातंत्र्यसैनिकांची नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. जातिव्यवस्थेच्या मुळाशी असलेल्या एंडोगॅमीला तोडून टाकण्याच्या आणि समाजाला सामाजिक गुलामीतून मुक्त करण्याच्या दिशेने हे ऐतिहासिक पाऊल उचलले गेले असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली आहे.


भारताला शतकानुशतकं गुलाम ठेवणारं मूळ कारण म्हणजे जाति आणि एंडोगॅमी आहे. 1947 मध्ये राजकीय स्वातंत्र्य मिळालं, पण सामाजिक स्वातंत्र्य आजही अधुरं आहे. एंडोगॅमी तोडल्याशिवाय भारत महासत्ता होऊ शकत नाही. भारतीय संविधानालाही या लढ्याचा भक्कम आधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


भारतीय संविधानाच्या कलम 14 आणि 15 समानतेचा आणि भेदभावविरोधाचा हक्क, कलम 17 अस्पृश्‍यतेवर संपूर्ण बंदी, कलम 19 व 21 विचारस्वातंत्र्य आणि विवाहातील निवडीचं स्वातंत्र्य आहे. सर्वोच्च न्यायालयानेही विविध निकालांत आंतरजातीय विवाह हा संविधानिक हक्क असल्याचे स्पष्ट केले आहे. 13 सप्टेंबर 2025 पासून ही नोंदणी मोहीम सुरू होणार असून, त्या दिवसापासून भारतातील प्रत्येक आंतरजातीय विवाह हा केवळ वैयक्तिक निर्णय न राहता सामाजिक स्वातंत्र्याचा शस्त्रप्रहार ठरणार असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.


प्रत्येक आंतरजातीय विवाह म्हणजे सामाजिक गुलामीविरुद्धचा प्रहार आहे. नोंदणी करणारा प्रत्येक युवक/युवती म्हणजे सामाजिक स्वातंत्र्यसैनिक ठरणार आहे. एंडोगॅमीमुक्त भारत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यप्राप्त भारत आहे. युवक-युवतींना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *