रोटी व्यवहार ते बेटी व्यवहाराने समाजबदलाची खरी क्रांती अजून बाकी -ॲड. कारभारी गवळी
बाबासाहेबांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या इतिहासात मराठा समाजाला कुणबी दर्जा देऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यात आंदोलक मनोज जरांगे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निर्णायक यश संपादन केले. हा रोटी व्यवहाराचा विजय, लोकशाहीच्या चौकटीत मिळवलेला आर्थिक न्यायाचा नवा टप्पा आहे. मात्र हा विजय अंतिम नाही, तर खरी क्रांती अजून बाकी असून, ती बेटी व्यवहार रुपाने साध्य होणार असल्याची भावना पीपल्स हेल्पलाइनचे ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केली आहे.
ॲड. गवळी म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातिभेद निर्मूलनासाठी संविधान, कायदे व आरक्षणाचा मार्ग दाखवला. पण समाजातील जातीय प्रवृत्ती बदलताना दिसत नाही. जात नष्ट करायची असेल, तर रक्ताचे नातेसंबंध जोडावे लागतात आणि ते फक्त आंतरजातीय विवाहातून शक्य होणार आहे. अखिल ओबीसी समाजाने आता सगे-सोयरे तत्त्वज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. आपण सगळे ओबीसी समाजातील लोक एकमेकांचे नातेवाईक आहोत, तर मग मुलामुलींचे विवाह समाजातील विविध जातींमध्ये का होऊ नयेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
रोटी व्यवहार आपल्याला एकत्र बसवतो, पण बेटी व्यवहार आपल्याला एकत्र उभे करतो. हा केवळ दोन व्यक्तींचा विवाह नसतो, तर दोन समाजांचा, दोन परंपरांचा, दोन संस्कृतींचा मिलाप असतो. जेव्हा ओबीसी समाजातील सर्व जाती आपसांत सगे-सोयरे बनतात, तेव्हा जातीच्या भिंती कायमस्वरूपी ढासळणार असल्याचे गवळी यांनी म्हंटले आहे.
मनोज जरांगे आणि राधाकृष्ण विखे यांच्यावर खरी जबाबदारी असल्याचे सांगून गवळी म्हणाले की, फक्त आरक्षणापुरते थांबू नका. समाजाच्या आत्म्यातील जातिभेदाची जखडण तोडा. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन द्या, त्यासाठी कायदेशीर-सामाजिक संरक्षण द्या आणि सगे-सोयरे क्रांतीची मशाल पेटवा. अन्यथा हा विजय फक्त राजकीय स्वार्थासाठी मर्यादित ठरेल आणि भविष्यात लोक त्याला शकुनीपण म्हणून हिणवतील. परंतु बेटी व्यवहाराकडे धाडसी पाऊल टाकले, तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे वारस, समाजशिल्पकार व क्रांतिकारक नेते म्हणून इतिहासात नोंद होणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
