जय हिंद फाउंडेशनचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांच्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने सुरु असलेल्या वृक्षरोपण व संवर्धन उपक्रमातंर्गत पारनेरच्या गटेवाडी व वडनेर हवेली येथील टेकडीवर महादेव मंदिर परिसरात 51 वडांची झाडे लावण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके, वडनेर हवेली गावचे शहिद जवान अरुण कुटे यांचे आई वडील बबन कुटे गुरुजी व विरमाता शांताबाई कुटे यांच्या हस्ते झाडे लावून वृक्षरोपण अभियानाची सुरुवात करण्यात आली. जय हिंदचे शिवाजी पालवे, मारुती पोटघन, शिवाजी गर्जे, सचिन दहिफळे, संदीप गट, संतोष दिवटे, कारभारी पोटघन, कचरू शिंदे, नितीन दावभट, बबन कुटे, रामराव रेपाळे, उत्तम भालेकर, दिपक भालेकर, आबा रेपाळे, सुभाष शिंदे, सौनुळे गुरुजी, सतीश भालेकर आदी उपस्थित होते.
राणीताई लंके म्हणाल्या की, पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धनाशिवाय पर्याय नाही. माजी सैनिकांनी वृक्षरोपण चळवळीत घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. वृक्षरोपणाने पर्यावरणाचा समतोल साधला जावून बळीराजा सुखावणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी पालवे म्हणाले की, देश रक्षणाचे कर्तव्य बजावून पर्यावरण रक्षणासाठी माजी सैनिक योगदान देत आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून त्याचे संवर्धन केल्यास मोठी हरितक्रांती होणार आहे. पारनेर मधील राळेगणसिध्दीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली देशासमोर जलसंवर्धनाचा एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या प्रेरणेने पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले. संदीप गट, आबा रेपाळे, रामराव रेपाळे यांनी लावलेल्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी स्विकारली. आभार शिवाजी गर्जे यांनी मानले.