राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे चंद्रशेखर पंचमुख यांचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांना तातडीने पदोन्नती द्यावी -पंचमुख
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात शेकडो शाळा मुख्याध्यापकांविना चालत असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. गेल्या वर्षभरापासून मुख्याध्यापक पदावर कोणतीही पदोन्नती न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सामाजिक न्याय विभागाचे नगर तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पंचमुख यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना निवेदन देऊन तातडीने पदोन्नतीची मागणी केली.
पंचमुख यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये सेवा ज्येष्ठ शिक्षकांकडेच वर्ग सांभाळून मुख्याध्यापकांचा अतिरिक्त कार्यभार दिला जातो. यामुळे शिक्षकांवर दुहेरी ताण पडत असून, अध्यापनाची गुणवत्ता कमी होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
गेल्या वर्षभरापासून मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रक्रिया लवकरच होईल, असा दावा शिक्षण विभागाने वारंवार केला होता. मात्र प्रत्यक्षात अद्याप नियुक्ती झालेली नाही. दरवेळी तालुकास्तरावरून माहिती मागवली जाते, याद्या प्रसिद्ध केल्या जातात, तरीही मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीचा विषय रखडलेलाच आहे. पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती दिली गेली असताना अहमदनगर जिल्हा परिषद मात्र मागे पडली आहे.
यंदाच्या 2025 च्या बदली प्रक्रियेत फक्त दोनच मुख्याध्यापकांच्या बदल्या झाल्या आहेत. मग उर्वरित रिक्त जागांवर पदोन्नती का होत नाही? शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची पदोन्नती सहा महिन्यांत तीन वेळा केली जाते, मात्र शाळांना मुख्याध्यापक देण्यासाठी मात्र विलंब का? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
पंचमुख यांनी शिक्षक दिन (5 सप्टेंबर)पर्यंत मुख्याध्यापक पदाच्या रिक्त जागांवर पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुढील आंदोलनाचा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.