अण्णाभाऊ साठे जयंती मासनिमित्त विविध उपक्रमांचा समावेश
शासनाचा समाजभूषण पुरस्कार प्राप्त सकट व आल्हाट यांचा गौरव
नगर (प्रतिनिधी)- अळकुटी (ता. पारनेर) येथे श्री हरीबाबांचा उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती मास निमित्त समाजजागृतीसाठी विविध उपक्रम पार पडले.
महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त सुनिल सकट व राजेंद्र आल्हाट यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रारंभी सुनील सकट व सौ. वंदना सकट यांनी सपत्नीक हरीबाबांची विधिवत पूजा-अभिषेक करून उत्सवाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारुड, शाहिरी, समाज प्रबोधनात्मक गीतांचे कार्यक्रम रंगले होते. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे समाज प्रबोधिनी कलामंच प्रस्तुत अण्णाभाऊ साठे गौरव गीत सादर करण्यात आले. सकट यांनी तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबाजीशेठ भंडारी यांना अण्णाभाऊ साठे यांची फकीरा कांदबरी भेट देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संयोजक ज्येष्ठ नेते शशिकांत (आण्णा) कनींगध्वज प्रास्ताविकात म्हणाले की, हा उत्सव फक्त धार्मिक न ठेवता त्याला सामाजिक कार्याची जोड देण्यात आली आहे. महापुरुषांच्या जयंतीसोहळ्याच्या माध्यमातून समाजाला दिशा देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच डॉ. कोमलताई भंडारी, माजी उपसरपंच अरिफभाई पटेल, बाळासाहेब पुंडे, अळकुटी ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन महेश शिरोळे, अतुल माने, भिमाजी कनींगध्वज, श्रीकांत कनींगध्वज, मोहन साळवे, हरिभाऊ कनींगध्वज, बाळू कनींगध्वज, संभाजी साळवे, गोरक्ष कनींगध्वज, मनोहर कनींगध्वज, घनश्याम कनींगध्वज, सोमनाथ कनींगध्वज, संतोष शिंदे, पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, उत्तमराव गायकवाड, प्रिया. गायकवाड, मंगल साळवे, वैशाली आढाव, नवनाथ शिरोळे, संतोष कनिंगध्वज आदी उपस्थित होते.
बाबाजीशेठ भंडारी म्हणाले की, अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते तर ते समाजाचे प्रबोधक होते. त्यांनी फकीरा सारख्या कादंबरीतून वंचित, शोषित, व भटक्या समाजाचा आवाज बुलंद केला. त्यांच्या कार्याचे स्मरण करणे म्हणजे समाजाला पुन्हा क्रांतीचा मार्ग दाखवणे सारखे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरपंच डॉ. कोमलताई भंडारी यांनी हरीबाबा उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून, तो सामाजिक एकतेचा दुवा आहे. गावातील सर्व समाजघटकांनी उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने खऱ्या अर्थाने संपूर्ण गाव एक कुटुंब ही संकल्पना इथे साकार झाली आहे. समाजातील तरुणांनी शिक्षण, उद्योग आणि सामाजिक कार्य यामध्ये पुढाकार घ्यावा, हीच खरी अण्णाभाऊंना वंदन ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम कनींगध्वज, संतोष कनींगध्वज, अक्षय कनींगध्वज, अक्षय साठे, दादाभाऊ कनींगध्वज, निलेश साळवे आदींसह दादाभाऊ कनींगध्वज परिवाराने परिश्रम घेतले.