• Wed. Nov 5th, 2025

घरोघरी एव्हरेस्ट अबॅकस असावे -पोलीस निरीक्षक केंजळे

ByMirror

Aug 21, 2025

दिव्यांग राजनंदिनीने गणिताचे एव्हरेस्ट केले सर

नगर (प्रतिनिधी)- शालेय जीवनात गणिताचा पाया पक्का झाल्यास आयुष्यभर माणूस मागे पडत नाही. अबॅकसने भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात अमुलाग्र बदल घडवून आणलेले आहेत व शैक्षणिक क्रांती देखील केलेली आहे. विविध स्पर्धा परीक्षांसाठी गणित हा महत्त्वाचा पाया असतो. याकरिता घरोघरी एव्हरेस्ट अबॅकस असावे असे, प्रतिपादन पोलीस निरीक्षक संतोष केंजळे यांनी केले.


अबॅकस क्षेत्रात सुमारे 43 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या एव्हरेस्ट अकॅडमीच्या वतीने 37 व्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंजळे बोलत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, नगरसेवक विठ्ठल पवार, प्राचार्य रामदास थिटे, प्राचार्य नॅन्सी पायस, सिने बालकलाकार साईराज सरडे, कु. स्वरा आकडकर, मुख्याध्यापक संतोष येवले, अशोक घडेकर, अबॅकस नवसंशोधनातील पहिली पीएचडी प्राप्त डॉ.सौ.कल्पना घडेकर आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.


प्रथमतः प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती व अबॅकस पाटीचे पूजन तसेच दीपप्रज्वलन संपन्न झाले. अकॅडमीच्या वतीने अतिथींचा सत्कार संपन्न झाल्यानंतर प्रास्ताविकात डॉ.सौ.घडेकर म्हणाल्या की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अबॅकस सारख्या आधुनिक शिक्षण तंत्राचा अवलंब करण्यासाठी आणि गेल्या 42 वर्षांपासून काम करत आहोत. माझी शाळा माझे अबॅकस या अभियानाच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील शाळांपर्यंत पोहोचत आहोत. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात अबॅकस सारखी नवीन गोष्ट शिकायला मिळते याचे समाजाला अप्रूप वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.


दिव्यांग असूनही अबॅकसमध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या कु. राजनंदिनी मस्तुद या विद्यार्थिनीचा विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षिका सौ. कळमकर यांनी सर्वांसमोर विद्यार्थ्यांच्या मदतीने अबॅकसचा डेमो सादर केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेले अबॅकसचे प्रात्यक्षिक पाहून उपस्थित पाहुणे व पालक भारावून गेले.


अकॅडमीचे ब्रँड अँबेसिडर असलेल्या दोन्ही सिने बालकलाकारांनी विविध प्रसंग सादर करून विद्यार्थ्यांचे व उपस्थितांचे मनोरंजन केले. अबॅकस स्पर्धेमध्ये सुमारे 500 विद्यार्थी सहभागी झाले होते. सुमारे 350 विद्यार्थ्यांना विविध गटांमध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित छावा हा चित्रपट दाखवण्यात आला.


लहान गटात कार्तिक जरे, वेदांशू मोरे, अमयरा गाढवे, स्वरूप वाघमारे, प्रणव बर्वे, श्‍लोक कोरके, समृद्धी सातपुते आदी चॅम्पियन पदाचे मानकरी ठरले तर मोठ्या गटात दक्ष धोत्रे, प्रथमेश भागवत, श्‍लेष हजारे, स्वरा वाघमारे, तन्वी मिडगुले, दिव्यम ढवळे, आराध्या गवारे, श्‍लोक वाबळे, शुभेच्छा गायकवाड आदी विद्यार्थी चॅम्पियन ठरले. बेस्ट टीचर पुरस्कार सौ. प्रणिता पाटील सौ. भारती भोसले यांना प्रदान करण्यात आला. तर स्टार टीचर किताबाच्या मानकरी सौ. शितल जंबे ठरल्या स्वागत प्रणिता पाटील यांनी केले. आभार प्रतिभा पुजारी यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *