भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत देशभक्तीचा जागर
विद्यार्थ्यांनी देशसेवेचे संस्कार जोपासावेत -अनिता काळे
नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रगीताचे सूर आणि देशभक्तीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने देशभक्तीची ऊर्जेने परिसर दुमदुमूण गेला. दुमदुमून गेला.
सकाळी शाळेच्या आवारात मुख्याध्यापिका अनिता काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका शारदाताई ढवण, सरीता अढवण, सहशिक्षिका शितल आवारे, सुरेखा वाघ यांच्यासह गावातील पालक, नागरिक आणि शाळेचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मने जिंकली. लहान मुलींनी भारत मातेची वेशभूषा धारण करून मातृभूमीचे प्रतिकात्मक दर्शन घडवले, तर मुलांनी लष्करी जवानाच्या वेशभूषेत भारत मातेच्या रक्षणासाठी शौर्य आणि बलिदानाचे चित्र उभे केले. विद्यार्थ्यांनी देशासाठी शूर जवानांनी केलेले योगदान, त्यांचे त्याग आणि बलिदान यांचे नाट्यरूपी सादरीकरणाने उपस्थितांना भावूक केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे देशभक्तीपर गीते सादर करुन भारत मातेचा जयघोष केला.
मुख्याध्यापिका अनिता काळे म्हणाल्या की, हा दिवस हा आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती जागविण्याचा आहे. त्याग, शौर्य आणि देशभक्ती या मूल्यांवर भारताचे स्वातंत्र्य उभे आहे. शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलामध्ये हीच देशभक्ती रुजवणे हे शिक्षक व पालकांचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे तर सामाजिक कार्य, स्वच्छता, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रसेवेतही पुढाकार घ्यावा. प्रत्येक मुलाने आपल्या क्षमतेनुसार समाजासाठी कार्य करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाने शाळेत उत्साह, देशभक्ती आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
