डायालाल पटेल यांची तक्रार असूनही कारवाई नाही; आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात दिवसेंदिवस बेकायदेशीर ताबा मारण्याच्या घटना वाढत चालल्या असून, अशाच प्रकारची घटना स्टेशन रस्त्यावरील माळीवाडा बसस्थानकासमोरील व्यापारी मालमत्तेवर पडला आहे. शिवशक्ती स्वॉमीलचे मालक डायालाल करसन पटेल यांनी आपल्या जागेवर अमित कोठारी, पोपट बोरा, फारुकभाई यांच्यासह 10-12 जणांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या सर्वांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि कुटुंबीयांना संरक्षण द्यावे, अन्यथा 15 ऑगस्टपासून नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा पटेल यांनी दिला आहे.
माळीवाडा बसस्थानक समोरील जुने सर्व्हे नं. 36/बी, नगर रचना टीपी स्कीम नं. 03, फायनल प्लॉट 46, अकबर प्रेस येथील सथ्था चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीच्या जागेत डायालाल करसन पटेल हे मागील 6-7 दशकांपासून भाडेकरू असून, तेथे शिवशक्ती स्वॉमील या नावाने व्यवसाय चालवत आहेत. 3 ऑगस्ट रोजी आरोपींनी अनधिकृत प्रवेश करून जागेत पत्र्याचे कंपाऊंड उभारण्यास सुरुवात केली. चौकशी करण्याचा प्रयत्न केल्यावर अमित कोठारी यांनी पटेल व त्यांच्या मुलाला शिवीगाळ करत जागा रिकामी न केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली आणि सिमेंट-काँक्रीटची भिंत उभारली.
घटनेनंतर पटेल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये सविस्तर तक्रार दिली, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. 10 ऑगस्ट रोजी पुन्हा आरोपींनी लोकांना पाठवून स्वॉमील समोरील पत्र्याचे कंपाऊंड काढून लोखंडी गेट बसवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पटेल यांचा मुलगा विरोध करण्यासाठी आला असता त्याला शिवीगाळ करून हाकलून लावण्यात आले.
सदर जागेबाबत 1990 मध्ये ट्रस्टने नागरी दावा (क्र. 920/1990) दाखल केला होता, जो 27 जानेवारी 1999 रोजी न्यायालयाने पटेल यांच्या बाजूने निकाल दिला. ट्रस्टने केलेले अपील (क्र. 286/1999) देखील 17 जानेवारी 2012 रोजी उच्च न्यायालयाने फेटाळले आहे. पटेल यांच्याकडे स्वॉमीलसाठी वन विभागाचा कायदेशीर परवाना, वीज वितरण कंपनी व महानगरपालिकेच्या सर्व परवानग्या असून, अनेक वर्षांपासून व्यवसाय सुरू आहे. तरीही आरोपी जागा बळकावण्याचा डाव आखत असल्याचा आरोप पटेल यांनी केला आहे.
आरोपींवर गुन्हा दाखल करून कुटुंबास संरक्षण न दिल्यास 15 ऑगस्टपासून नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा डायालाल पटेल यांनी दिला आहे.