• Tue. Oct 14th, 2025

शिक्षक बदलीत संवर्ग 1 च्या आजारी शिक्षकांची सरसकट तपासणी थांबवा

ByMirror

Jul 31, 2025

संशय असलेल्यांच्या आजारपणाची व वैद्यकीय प्रमाणपत्राची चौकशी व्हावी


बहुजन समाज पार्टीचे प्राथमिक शिक्षण विभागाला निवेदन

नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संवर्ग बदली 2025 अंतर्गत संवर्ग 1 मधील बदली करताना संशय असलेल्या व्यक्तींना बोलावून त्यांच्या आजारपणाची व वैद्यकीय प्रमाणपत्राची चौकशी करावी. सरसकट सर्व आजारी शिक्षकांना तपासणीला बोलावून त्यांच्या आरोग्याची हेळसांड थांबविण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.


बहुजन समाज पार्टीच्या शिष्टमंडळाने प्राथमिक शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे, जिल्हा प्रभारी सुनील ओव्हळ, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, सलीम अत्तार, बाळासाहेब काटे, जिल्हा महासचिव राजू शिंदे, तस्लीम शेख आदी उपस्थित होते.


जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा परिषद अंतर्गत सन 2025 ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरू आहे. संबंधित शिक्षकांनी सादर केलेले आजारपणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र ससून रुग्णालय व जे.जे. रुग्णालय मुंबई या ठिकाणाहून आणलेले आहेत. अशा रुग्णांना पुन्हा या ठिकाणी मेडिकल बोर्ड समोर हजर होणे व तपासणी करणे त्रासदायक आहे. यामुळे शिक्षक असलेल्या आजारी व्यक्तींना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


ज्यांच्या बाबत संशय आहे, ज्यांनी हे प्रमाणपत्र दिले नाही अशा रुग्णांना बोलावून त्यांची चौकशी होणे आवश्‍यक आहे. मात्र सरसकट सर्व रुग्णांना बोलवून त्यांना एक प्रकारे त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. यामध्ये काही गंभीर आजारांचे व वयस्कर रुग्ण आहेत. अशा रुग्णांना पुन्हा बोलावून विनाकारण त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे निवेदनात म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *