• Tue. Oct 14th, 2025

नेहरु मार्केटच्या मूळ गाळेधारकांना लिलाव न करता पूर्वीप्रमाणेच भाडे तत्वावर गाळे द्यावे

ByMirror

Jul 31, 2025

सत्याच्या बाजूने उभे राहण्यासाठी आयुक्तांना गाळेधारकांच्या वतीने भगवत गीतेचा ग्रंथ भेट


नेहरु मार्केट गाळेधारक युनियनच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट

नगर (प्रतिनिधी)- नेहरु मार्केटच्या प्रास्तावित संकुलात मूळ गाळेधारक व ओटेवाल्यांना लिलाव न करता पूर्वीप्रमाणेच भाडे तत्वावर गाळे देण्याची मागणी नेहरु मार्केट गाळेधारक युनियन व सर्व गाळेधारकांच्या वतीने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


नेहरु मार्केट गाळेधारक युनियनचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे यांच्या नेतृत्वाखाली मूळ गाळे धारकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन सत्याच्या बाजूने उभे राहण्यासाठी भगवत गीतेचा ग्रंथ भेट देण्यात आला. यावेळी बालाजी गौरी, पवन खेतमाळस, रुपेश तरोटे, रत्नाकर डोळसे, राजेंद्र चौधरी, सुनंदा ताठे, वसंत गुगळे, रत्नाकर डोळसे, रामभाऊ खेतमाळस, वसंत गुगळे, अजय झिंजे आदी उपस्थित होते.


तब्बल 13 वर्षांपासून चितळे रोड वरील नेहरू मार्केटच्या मोकळ्या जागेच्या विकासाचा विषय प्रलंबित होता. महापालिकेने या जागेत भाजी मार्केटसह भव्य संकुल उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामही लवकरच सुरू होणार आहे. हा महत्त्वाचा विषय मार्गी लावल्याबद्दल आयुक्त डांगे यांचे सर्व गाळेधारक व युनियनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.


मूळ भाडेकरूंना या कामामुळे मोठा दिलासा मिळणार असून, त्यांची 13 वर्षाची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. 13 वर्षांपूर्वी नेहरू मार्केटची जागा संकुल उभारणीसाठी जमीनदोस्त करण्यात आली. तत्कालीन आयुक्तांनी वर्षभरात संकुल उभारून मूळ ओटेवाले गाळेधारकांना तिथेच जागा देण्याचे आश्‍वासन दिले होते. महापालिकेने उच्च न्यायालयात तसे लेखी सुद्धा दिलेले आहे. त्यानुसार आता प्रत्यक्ष संकुल उभे राहत असताना त्यावेळीचे 72 ओटेधारक भाजी विक्रेते, 12 गाळेधारक व 3 कराराने दिलेल्या मोकळ्या जागा या सर्व भाडेकरुंना नवीन संकुलात कोणत्याही लिलाव पध्दतीचे बंधन न ठेवता त्यांच्या हक्कानुसार पूर्वीप्रमाणेच भाडेतत्वावर प्रथम प्राधान्याने देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


सर्व ओटे व गाळ्यांचा लिलाव केल्यास गोरगरीब मूळ ओटेधारक, गाळेधारकांना आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे गाळे घेणे शक्य होणार नाही. जर सर्व ओटे व गाळ्यांचा लिलाव केल्यास या प्रक्रियेत राजकीय मंडळी, कार्यकर्ते, गुंड प्रवृत्तीचे लोक, धनिक मंडळी लिलावात सदर गाळे घेऊन तिथे अन्य व्यवसाय सुरू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी मूळ भाजी मार्केटचा उद्देश कदापि साध्य होणार नाही. भाडेतत्वावर ओटे व गाळे न मिळल्यास भाजीविक्रेतांना नाईलाजाने पुन्हा रस्त्यावर बसून व्यवसाय करावा लागेल. त्यामुळे अतिशय संवेदनशीलपणे सर्वसामान्य गोरगरीब ओटे व गाळेधारकांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचे निवेदनात म्हंटले आहे.


तत्कालीन नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांनी दूरदृष्टीने सर्वसामान्यसाठी नेहरू मार्केटची उभारणी सर्वसामान्यांच्या व्यापार व लोकहितासाठी केली होती. आताही महापालिका जनतेच्या करातून मिळालेल्या उत्पन्नातून संकुल उभारत आहे. त्यामुळे या संकुलाचा उद्देश कमर्शियल न ठेवता लोकहिताचा असला पाहिजे. ज्या कुशलतेने संकुल उभारणीचे काम मार्गी लावले आहे. त्याच कुशलतेने मूळ भाडेकरू असलेल्या ओटेधारक, गाळेधारकांना जागा दिली पाहिजे. कारण गाळे पाडतानाच त्यांना आश्‍वासन देण्यात आलेले असल्याची भावना युनियनच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. तसेच जागेची खाजगी मोजणी न करता, सरकारी मोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.


अन्यथा पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागेल -संजय झिंजे
भगवत गीतेमध्ये श्रीकृष्ण हे सत्याच्या बाजूने उभे राहिले होते. नेहरु मार्केटच्या प्रश्‍नात आयुक्तांनी देखील मूळ गाळेधारक व ओटेवाल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्याच्या बाजूने उभे रहावे. यासाठी त्यांना भगवत गीतेचा ग्रंथ देण्यात आला आहे. मूळ गाळेधारक व ओटेवाले सर्व गोरगरीब असून, त्यांना दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे जागा उपलब्ध करुन द्यावी. अन्यथा पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागणार असल्याचे संजय झिंजे यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *