लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण आवश्यक -पै. नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- गोवंशीय जनावरांमध्ये आढळणारा व दुग्ध उत्पादनावर परिणाम करणारा लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना निमगाव वाघा (ता. नगर) येथे गोवंशीय जनावरांना लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली. डोंगरे वस्तीवर जनावरांना लम्पी प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. यावेळी एल.एस.एस. बजरंग उरमुडे, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, जालिंदर जऱ्हाड, मंदाताई डोंगरे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, जिल्ह्यात पुन्हा लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी सौम्य लक्षणाची जनावरे सापडत आहे. हा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात लम्पी आजाराचा उद्रेक झाला होता. त्यावेळी सुमारे साडेचार हजारांवर जनावरे मृत्युमुखी पडली. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर या आजाराचा प्रादुर्भाव गोचीड, माशा, डासांमुळे होतो. त्यामुळे गोठा स्वच्छ ठेवणे व गोचीड, माश्यांचा प्रादुर्भाव होणार नाही, याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.