शिक्षक आमदार गाणार यांचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव व शिक्षण आयुक्तांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टल व्यवस्था अद्यावत करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नुकतेच शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल व शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
शासन निर्णयानुसार विदर्भ वगळून राज्यातील अन्य भागातील शाळा 15 जून पासून व विदर्भातील शाळा 27 जून पासून सुरू होत आहे. त्यानुसार व्यवस्था करण्यासाठी सुचना सुद्धा देण्यात आलेले आहेत. परंतु शाळेत रिक्त असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या पदाबाबत कोणत्याही प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत. अनेक शाळेत मोठ्या संख्येत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची पदे रिक्त आहेत. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी निर्माण केलेली पवित्र पोर्टल योजना थंड बस्त्यात पडली आहे. त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अनेक संस्थाचालक नियमबाह्य व बोगस नियुक्त्या प्रत्येकी वीस ते पंचवीस लाख रुपये घेऊन करीत असल्याचा आरोप शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे.
या बोगस नियुक्त्यांना शिक्षण विभागाचे अधिकारी आर्थिक आमिषाखाली मान्यता व शालार्थ आयडी प्रदान करीत आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे. शाळेतील शैक्षणिक व्यवस्था गुणवत्तापूर्ण ठेवण्यासाठी व विद्यार्थ्यांची शैक्षणिक भविष्य घडविण्यासाठी रिक्त असलेल्या शिक्षकांच्या पदावर पवित्र पोर्टलद्वारेच नियुक्ती करण्याचे बंधन पाळल्यास संस्थाचालकांना बाध्य करावे, तसेच शिक्षकेतर कर्मचार्यांच्या रिक्त पदावर नियुक्ती करण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी, शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टल व्यवस्था अद्यावत करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, राज्य महिला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी, नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर, माजी अध्यक्ष बाबासाहेब काळे, माजी आमदार भगवानअप्पा साळुंखे, सुमन हिरे, मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, प्रा.सुनिल पंडित, उषा नाडकर्णी आदी राज्य कार्यकारणी सदस्य प्रयत्नशील आहेत.