श्री विठ्ठल रुख्मिणी आणि संत, महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष
टाळ-मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा जयघोष
नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेचा आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दिंडीत श्री विठ्ठल रुख्मिणी, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, मिराबाई , मुक्ताबाई यांच्या वेशभूषेत असलेल्या दिंडीतील चिमुकल्यांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधले. शाळेत रंगलेल्या रिंगण सोहळ्यात शिक्षिका, पालक आणि विद्यार्थिनींनी फुगड्यांचा फेर धरला होता.
टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठू नामाच्या जय घोषात, पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थी उत्स्फुर्तपणे दिंडीत सहभागी झाले होते. तर मुली तुलसी वृंदावन घेऊन उपस्थित होत्या. शालेय परिसरातून दिंडीचे मार्गक्रमण झाले. दिंडीतून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्राची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायची माहिती सांगण्यात आली.
दिंडीचे प्रारंभ शाळे जवळ असलेल्या श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात आरती करून करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे, सहशिक्षिका शितल आवारे, सुरेखा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांची दिंडी निघाली होती. अनिता काळे यांनी सक्षम पिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच संस्काराची रुजवण करणे देखील महत्त्वाचे आहे.
अध्यात्मातून मुलांवर संस्कार व आपल्या पारंपारिक सण-उत्सवातून संस्कृतीची जोपासणा होत असते. या उद्देशाने जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.