• Tue. Jul 8th, 2025

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आश्‍वासनाची पुर्तता; संघटनेला अनुदानपत्र प्राप्त

ByMirror

Jul 4, 2025

दर महिन्याच्या 5 तारखेआधीच पेन्शन होणार जमा

अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशनच्या वतीने निर्णयाचे स्वागत

नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशनच्या माध्यमातून अदालत पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे दर महिन्याच्या 5 तारखेच्या आत सर्व पेन्शनधारकांची पेन्शन जमा होणार असल्याचे संघटनेला अनुदानपत्र प्राप्त झाले असून, या निर्णयाचे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.


या अदालतीत मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पेन्शन संदर्भातील धोरण स्पष्ट केले. तसेच अंश राशीकरण, उपदान रक्कम, निवड श्रेणी व प्रलंबित मुद्यांवर तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेले प्रश्‍न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संगणक वसुलीबाबत देखील लवकरच रक्कम मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याने, संबंधित लाभार्थींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स असोशिएशनच्या विविध मागण्यांबाबत शिक्षण संचालक पुणे यांच्याशी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी आमदार सत्यजीत तांबे यांना निवेदन देण्यात आले असून, ते लवकरच पुढाकार घेणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.


पेन्शनच्या निर्णयाने सर्व पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशन जिल्ह्यातील पेन्शनधारकांचे प्रश्‍न वेळोवेळी प्रशासनाकडे मांडत आहे. उर्वरित प्रलंबित मागण्यांसाठीही पाठपुरावा सुरू असून, लवकरच त्या सोडवल्या जातील असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे.


पेन्शनर्सचे विविध प्रश्‍न सुटण्यासाठी अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशनचे दशरथ ठुबे, सरचिटणीस बन्सी उबाळे कार्याध्यक्ष रावसाहेब पवार, उपाध्यक्ष विनायक कोल्हे, सुखदेव वांडेकर, ज्ञानदेव लंके, धोंडीबा गांगर्डे, सोमनाथ कळसकर, बापूसाहेब कर्पे, कारभारी शिकारे, भाऊसाहेब लावरे, ज्ञानदेव थोरात, रामचंद्र ठोंबरे, भाऊसाहेब गोरे, अविनाश गांगर्डे, प्रताप आंब्रे, बेबीताई तोडमल, शामला साठे, निनाबाई जोंधळे, गजानन ढवळे, मुरलीधर देशमुख आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *